कलासम्राट व कलासम्राज्ञी सोहळा

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक दिवंगत आत्माराम भेंडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत ‘कलासम्राट व कलासम्राज्ञी’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आत्माराम भेंडे यांच्यासह अन्य दिग्गज कलाकार मंडळींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

यात आशा भेंडे, नंदू भेंडे, केशवराव भोळेस ज्योत्स्ना भोळे, जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, बबन प्रभू, नीलम प्रभू (करुणा देव), कुसुम रानडे, वसंतराव कामेरकर, राजा  बढे यांचा समावेश होता. श्रीप्रसाद मालाडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.ज्येष्ठ अभिनेते अंबर कोठारे, सरोज कोठारे, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, दूरदर्शनवरील निर्माते याकुब सईद आणि अन्य मंडळींनी भेंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी रंगभूमीवर ‘फार्स’चा नवीन प्रवाह आत्माराम भेंडे व बबन प्रभू यांनी सुरू केल्याचे नयना आपटे म्हणाल्या.

बबन प्रभू आणि नीलम प्रभू यांच्या आठवणी ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव, अनुराधा मराठे व अन्य सृहृदांनी सांगितल्या. तर आकाशवाणीवरील निवेदिका कमलिनी विजयकर यांनी आकाशवाणीवरील आठवणींना उजाळा दिला. आकाशवाणीच्या ज्येष्ठ वृत्तनिवेदिका कुसुम रानडे यांच्याविषयी बोलताना प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे म्हणाल्या, कुसुम रानडे या उत्तम पाश्र्वगायिकाही होत्या. रेडिओ सिलोनवर त्यांनी गायलेली गाणी ऐकायला मिळाली होती. मात्र त्यांची ही ओळख फारशी कोणाला नव्हती. तर केशवराव भोळे व ज्योत्स्ना भोळे यांच्याबद्दल त्यांची कन्या व ज्येष्ठ गायिका वंदना खांडेकर, ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी आठवणींचा पट  उलगडला. गजाननराव वाटवे यांच्या कन्या मंजिरी वाटवे-चुनेकर यांनी वडिलांबद्दल सांगितले. ‘एचएमव्ही’तील अधिकारी वसंतराव कामेरकर यांच्या आठवणी त्यांच्या कन्या सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे यांनी तसेच ज्येष्ठ गायिका नीलाक्षी जुवेकर यांनी जागविल्या. गीतकार राजा बढे यांच्याही आठवणींना उजाळा देण्यात आला.