भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर आणि दिग्दर्शक डॉ. रवी गोडसे हे हॉलिवूड तसेच मराठी कलाकारांना घेऊन एक वेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. या चित्रपटाचं नाव आहे ‘रिमेम्बर एम्नेशिया’. येत्या २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात हॉलिवूड कलाकार टोवा फेल्डशुह, लिसा एन वॉल्टर, कर्टिस कुक सह श्रुती मराठे, दिलीप राव, विजय पाटकर, महेश मांजरेकर, मोहन अगाशे यांसारखे मराठी कलाकारही पाहायला मिळणार आहेत.

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉक्टरची भारत भेटीदरम्यान झालेल्या अपघातात स्मृती जाते. काही दिवसांनी त्याची स्मृती परततेही मात्र आपणच पत्नीचा खून केलाय हे त्याला आठवत नाही, साधरण या कथानकावर ‘रिमेम्बर एम्नेशिया’ चित्रपट आधारलेला आहे.

या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाली यासाठी अभिनेत्री श्रुती मराठेनेही आनंद व्यक्त केला आहे. फार कमी वेळा एकाच चित्रपटात अनेक कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते. या चित्रपटात तर अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारही पाहायला मिळाले. प्रत्येकाचा अभिनय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव हा खूपच वेगळा होता, प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यासारखं होतं अशा शब्दात श्रुती मराठेनं आपलं मनोगत व्यक्त केलं.

”रवी गोडसे सारख्या दिग्दर्शकासोबत काम करताना आनंद झाला. त्यांनी या चित्रपटाद्वारे तीन चित्रपटसृष्टींना एकत्र आणलं. आतापर्यंत कधीही न साकारलेली भूमिका निभावण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्तानं मला मिळाली. ही भूमिका आव्हानात्मक होती, मात्र कलाकार म्हणून ती खूप काही शिकवणारी होती”, अशा शब्दांत महेश मांजरेकर यांनी कौतुक केलं आहे.