‘सैराट’ चित्रपटानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरू ‘कागर’ या चित्रपटातून तर ‘रिंगण’, ‘यंग्राड’ चित्रपटानंतर दिग्दर्शक मकरंद माने ‘कागर’ चित्रपटातून गावाकडची राजकीय पार्श्वभूमी असलेला तितकाच जिव्हाळ्याचा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर आले आहेत. रिंकू आणि मकरंद हे दोघे राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘कागर’ चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

‘सैराट’नंतर तीन वर्षांनी रिंकू मोठ्या पडद्यावर परत येतेय. ‘कागर’च्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटातील रिंकूच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटातील ‘राणी’ ही व्यक्तीरेखा साकारताना दडपण असण्यापेक्षा आव्हान अधिक होतं असं ती म्हणते. भूमिकेविषयी सांगताना रिंकूने तिच्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अभिनयाखेरीज मी पुस्तकं वाचणं, स्वयंपाक करणं, रांगोळी, मेंदी किंवा चित्र काढणं, गप्पा मागणे यात मी रमते, असं तिने सांगितलं.

याविषयी ती पुढे म्हणाली, ‘घरात आणि मैत्रिणींशी खूप गप्पा मारायच्या, खायचं-प्यायचं आणि मन लावून अभ्यास करायचा हेच माझं आयुष्य होतं. पण त्यात आता खूप बदल झाला आहे. पदवीपर्यंत शिक्षण घ्यायचं आहे. मला नायिकाप्रधान चित्रपट बघायला खूप आवडतात. अशा चित्रपटांमध्ये काम करायलाही आवडेल. अभिनेत्री श्रीदेवी आणि स्मिता पाटील एखादी भूमिका साकारताना चित्रपटात इतर व्यक्तिरेखांपेक्षा आपला स्वत:चा प्रभाव निर्माण करतात. मलाही असे चित्रपट करायचे आहे.’

यावेळी रिंकूने सावित्रीबाई फुले यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचीही भूमिका साकारायची इच्छा आहे. चित्रपट माध्यमात भविष्यात छायाचित्रण आणि दिग्दर्शन शिकायचे आहे,’ असं तिने सांगितलं.

मकरंद माने दिग्दर्शिक ‘कागर’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.