बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार अभिनयातून पैसे कमावता कमावता इथेच आणखी काय काय करता येईल याची चाचपणी करीत असतात. कधी चित्रपट निर्माता म्हणून, कधी स्टेज शो करून पैसे कमावतात. मात्र, आपल्या रितेश देशमुखने अभिनय सांभाळून आणखी एक व्यवसाय मनापासून जपला आहे तो म्हणजे अंतर्गत सजावटीचा. नुकतेच रितेशने डिझाइन केलेले ‘रेड चिलीज् एण्टरटेन्मेंट’चे कार्यालय शाहरुख खानला ‘लय भारी’ वाटले.
रितेशने कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिटय़ूट फॉर आर्किटेक्चर अ‍ॅण्ड एनव्हायरन्मेंटल स्टडीज या संस्थेतून आर्किटेक्चरची पदवी घेतली आहे. मात्र त्याला त्याची वाट सापडली ती अभिनय क्षेत्रात. पण मधूनमधून रितेश आपला हा मूळ व्यवसायही सांभाळतो. मध्यंतरी शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज् एण्टरटेन्मेंट’चे कार्यालय सजविण्याची जबाबदारी रितेशवर येऊन पडली. रितेशने जे ‘रेड चिलीज्’चे कार्यालय डिझाइन केले ते शाहरुखला इतके आवडले की, त्याने ट्विटरवरून रितेशचे तोंडभरून कौतुक केले. अगदी खास चहापानाचे आमंत्रणही त्याला दिले. रितेशनेही ट्विटरवरूनच शाहरुखला आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवून काम करू दिल्याबद्दल आभार मानले.
याआधीही रितेशने दिग्दर्शक करण जोहरचे वांद्रे येथील युनियन पार्कमधील घर डिझाइन करून दिले होते. चित्रपट निर्माता म्हणूनही रितेश सध्या ‘लय भारी’ काम करतो आहेच; पण ज्यात आपण शिक्षण घेतले आहे त्याचाही तो आपल्याच क्षेत्रातील सहकलाकारांसाठी चांगला उपयोग करून घेत आहे. त्यामुळे त्याचे कौतुकही केले जात आहे.