करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमाणामुळे सध्या जगभरातील लोक त्रस्त आहेत. लाखो लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. हजारो लोकांनी आपले प्राण गामावले आहे. परंतु भारतात मात्र करोनाच्या नावाखाली काही जण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांविरोधात हॉलिवूड अभिनेता रिज अहमद याने संताप व्यक्त केला आहे.

dailymail.co.uk.ने दिलेल्या वृत्तानुसार जीक्यू हाइप या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रिजने भारतातील धार्मिक तणावावर संताप व्यक्त केला. तो म्हणाला, “करोना विषाणू हल्ला करण्यापूर्वी जात, धर्म, पंत काहीच पाहात नाही. परंतु तरीही भारतात काही लोक करोनाच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. करोनाची तुलना जिहादशी करत आहेत. मी देखील मुस्लिम कुटुंबातील आहे, आणि माझ्या कुटुंबातील दोन सदस्यांना मी करोनामुळे गमावले आहे. या प्राणघातक विषाणूवर धर्माचं लेबल लावणं थांबवा. अन्यथा अनर्थ होईल.” अशा आशयाचे वक्तव्य करत रिज अहमदने आपली नाराजी व्यक्त केली.

रिज अहमद हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ‘नाईट क्रॉलर’, ‘वेनम’, ‘साउंड ऑफ मेटल’, ‘फोर लायन्स’, ‘ब्लॅक गोल्ड’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये रिज अहमदने काम केले आहे.