गुरमेहर कौरने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केल्यानंतर तिला सातत्याने धमक्या मिळत होत्या. क्रिकेटपटू, कलाकार या सर्वांनी तिची सोशल मिडियावर खिल्ली उडवली होती. त्यामुळे गुरमेहर गेल्या काही दिवसांपासून वादाचा केंद्रबिंदू बनली होती. या वादावर आता रेडिओ मिर्चीचा आरजे नावेदने गुरमेहर आणि वीरेंद्र सेहवागसाठी एक खास मेसेज देणारा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे.

गुरमेहरने ज्या पद्धतीने कागदावर मेसेज लिहून न बोलता तिचा संदेश सर्वापर्यंत पोहोचवला त्याप्रमाणे वीरेंद्र सेहवागनेही तिची नक्कल केली होती. आता आरजे नावेदनेही, देशभक्त गुरमेहर, सेहवाग, देशविरोधी यांना त्याने एक मोलाचा सल्ला दिला आहे. हा सल्ला म्हणजे तुमची मतं मांडण्यासाठी कागदाचा व्यर्थ वापर करु नका. कारण कागदांसाठी झाडं तोडली जातात. जर झाडं राहिली नाहीत तर माणूस राहणार नाही आणि पर्यायाने देशभक्त आणि देशविरोधी वाचतील. त्यानेही या गोष्टी सांगण्यासाठी कागदांचाच वापर केला होता. पण नंतर त्याने सांगितले की मी हे सर्व वापरलेले कागदच पुन्हा वापरले आहेत. कागद वाचवा आणि एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा एकमेकांवर प्रेम करा.

याआधी गुरमेहरने ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए) च्या निषेध मोर्चामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. आपल्याला जे काही बोलायचे होते, जे काही सांगायचे होते ते आपण सांगितले आहे. कृपया आता मला एकटे राहू द्या असे म्हणत तिने या वादातून माघार घेतली होती. तिच्या या निर्णयाला प्राध्यापकांनीही समर्थन दिले होते. एआयएसएने आयोजित केलेल्या मोर्चातून मी माघार घेत आहे. या वयात जे काही सहन करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे ते सर्वकाही मी सहन केले आहे, असे गुरमेहरने म्हटले होते. हे आंदोलन माझ्यापुरते मर्यादित नाही. तुम्ही सर्वांनी या आंदोलनाला जावे असे मला वाटते. या मोर्चाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी असे तिने म्हटले होते. या मोर्चासाठी माझ्याकडून शुभेच्छा असे गुरमेहरने म्हटले होते.

तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला होता. तर काही जणांनी तिचे समर्थन देखील केले होते. त्यानंतर हा वाद चिघळला. रॉबर्ट वढेरा, अरविंद केजरीवाल यांनी तिला समर्थन दिले होते. तर, तिच्या मनात कोण विष कालवत असा प्रश्न गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी उपस्थित केला होता. क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने देखील गुरमेहरच्या पोस्टची खिल्ली उडवणारी एक पोस्ट टाकली होती. त्यावर ही प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता.