अॅक्शन सीन्ससाठी बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय असणारा दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता रोहित अॅक्शन सीनचा भरणा असलेली एक वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून रोहित डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शेट्टी आठ भागांची एक अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज करणार आहे. ही सीरिज एका सत्य घटनेवर आधारीत आहे. या सीरिजचे नाव काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या रोहित त्याचा आगामी चित्रपट ‘सर्कस’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळात रोहित शेट्टीने या सीरिजची स्क्रिप्ट तयार केली असल्याचे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर रणवीरने चित्रपटाला होकार कळवला असल्याचे म्हटले जाते. तसेच या चित्रपटात रणवीर पहिल्यांदाच दोन भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हा चित्रपट ८०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘अंगूर’ चित्रपटाचा रिमेक असल्याचे म्हटले जाते. चित्रपटात रणवीरसोबत वरुण शर्मा, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.