बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला समर्थन करणाऱ्या लोकांचे चित्रपट यापुढे अजिबात पाहणार नाही असा निर्णय अभिनेत्री व भाजपा नेत्या रुपा गांगुली यांनी घेतला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्यांनी कलाविश्वातील घराणेशाहीवर सडकून टीका केली.

“यापुढे मी काही लोकांचे चित्रपट पाहणं बंद करणार आहे. कारण छोट्या गावांमधून मुलामुलींनी शहरात येऊन या इंडस्ट्रीत काम करू नये असा संदेश त्या लोकांनी देशाला दिला आहे. घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात असेल. पालक त्यांच्या मुलांना नक्कीच मदत करू शकतात. पण ही घराणेशाही इतकी वाढू नये की ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपले प्राण नकोसे वाटतील”, अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

रुपा गांगुली यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. “सुसाइड नोट नाही, स्टूल किंवा खुर्चीशिवाय त्याने गळफास घेतला आणि पोलिसांनी निष्कर्ष काढला की त्याने आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याचं सांगितलं जातंय. पण या सर्व गोष्टींमुळे हाच प्रश्न पडतोय की ही आत्महत्या कशी असू शकतो. पोस्टमॉर्टमच्या आधीच पोलीस त्याला आत्महत्या कसं म्हणू शकतात”, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

“फॉरेन्सिक टीम एक दिवस उशिरा पोहोचते आणि पोलीस म्हणतात की आत्महत्या प्रकरणात कोणतीही छेडछाड नाही. त्याच्या शरीरावर अनेक खूण आहेत. पोलिसांनी अजूनपर्यंत त्याच्या घराला का सील केलं नाही? सुशांतचा पाळीव कुत्रा कुठे आहे”, यांसारखे अनेक प्रश्न रुपा गांगुली यांनी या मुलाखतीत उपस्थित केले.

रुपा गांगुली यांनी याआधीही सुशांतच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टवरून संशय व्यक्त केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग करत त्यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.