लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर अनेकजण अजूनही रस्त्यावर फिरताना दिसतात. वारंवार आवाहन करूनसुद्धा काही लोक ऐकायला तयार नाहीत. अशा लोकांवर अभिनेते सचिन पिळगावकर संतापले आहेत. ‘थोडं तरी डोक्याचा वापर करा’, असं म्हणत त्यांनी बाहेर फिरणाऱ्या लोकांना सुनावलं आहे. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लोकांना आवाहनसुद्धा केलं आहे.

“करोना व्हायरस स्टेज २ वरून स्टेज ३ वर गेलाय. पंतप्रधान व मुख्यमंत्री आपल्या सर्वांना विनंती करतायत की तुम्ही घरी राहा. पण काही लोक ऐकायलाच तयार नाहीत. मी असं म्हणत नाहीये की लोक घरात थांबले नाहीत. असंख्य लोक घरात थांबले आहेत जे बुद्धिजीवी आहेत. पण काही लोक कोणाचंही ऐकत नाहीयेत. थोडं तरी डोक्याचा वापर करा. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांच्या कुटुंबीयांना सोडून आपल्याकरिता रोज मेहनत करत आहेत. त्यांना कुटुंबीय नाही का? तरीही सगळं सोडून काम करतायत. थोडं तरी डोकं वापरा आणि घरीच थांबा,” असं ते या व्हिडीओत म्हणत आहेत.

आणखी वाचा : हृतिक-सुझान पुन्हा एकत्र राहण्याबाबत राकेश रोशन म्हणतात..

दरम्यान, राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून आता तो ३२० वर पोहोचला आहे. मंगळवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३०२ एवढी होती. परंतु बुधवारी तो आकडा वाढून ३२० वर पोहोचला. यामध्ये मुंबईत १६ आणि पुण्यात २ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत.