‘बिच्छु हैं अपनी कहानी चिपक गयी है आपको!’ असं म्हणत आपली गोष्ट सांगणारा गणेश गायतोंडे परत येत आहे. त्यामुळे प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच काही दिवसापूर्वी या बहुप्रतिक्षीत वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली. ही उत्सुकता आणखी वाढविण्यासाठी नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवरुन ‘सेक्रेड गेम्स २’चा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा एकदा गायतोंडे आणि सरताज सिंग एकमेकांच्या समोर येणार आहेत.
‘सेक्रेड गेम्स २’च्या नव्या सीझनमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ‘भगवान को मानते हो, पर कभी सोचा है की भगवान किसको मानता है’, असं म्हणणाऱ्या गायतोंडेच्या या वाक्यामध्ये अनेक गोष्टींचा अर्थ दडलेला आहे.
दरम्यान, ‘सेक्रेड गेम्स२’ मध्ये गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कहाणी आणखी नवी वळणं घेणार आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीनं साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे यासारखे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संवाद आणि दृश्यानं भरलेली ही वेब सीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती प्रसिद्धही झाली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 29, 2019 1:43 pm