News Flash

Sacred Games 2 Review : मन सून्न करणारा ‘गोळी’बंद अनुभव!

गणेश गायतोंडे हाच नायक ठरतो, अनेक प्रश्नांची उकल या भागांमध्ये होत जाते

धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणतात.. पण अफूची गोळी आणि धर्मासोबत दिली तर? अफू आहे की काय गोची आहे ते माहित नाही. मात्र ती महत्त्वाची आहे, तिला जोडून धर्म आला तर खेळ खल्लास! असाच गोळीबंद अनुभव देतो तो सेक्रेड गेम्सचा सिझन 2! सेक्रेड गेम्सच्या सिझन 2 मध्ये या लाल गोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका ड्रगचा अंमल माणसाकडून काय काय करुन घेतो? काय काय घडवू शकतो? हे सगळं दाखवण्यात आलं आहे. आधीच्या सिझनची नाळ जोडण्यासाठी महत्त्वाची आहे ती गोळीच! गणेश गायतोंडे म्हणतो तो अनुभव येतोच… ये खेल बहुत बडा है सरदारजी! आपके मेरे सोचके कहीं ज्यादा उपर!

15 ऑगस्ट रोजी या Netflix वर बहुचर्चित सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन अपलोड करण्यात आला. या सीरिजमध्येही आठ भाग आहेत. या आठ भागांमध्ये आपल्याला अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. अनेक गोष्टींची उकल होत जाते. मात्र काही उणिवाही राहिल्या आहेत हे विसरुन चालणार नाही. सैफ अली खान (सरताज सिंग) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अर्थात गणेश गायतोंडे या दोघांचा हा 25 दिवसांमधला प्रवास आहे. D DAY पर्यंत हा प्रवास येतो… आणि एका अशा वळणावर संपतो जिथे म्हटलं तर शेवट आहे.. म्हटलं तर उत्कंठाही! अपूर्णत्त्वातही पूर्णत्त्व गाठलं गेलंय.. आणि पूर्णत्त्वात अपूर्णत्व ठेवलं गेलंय, हेच सेक्रेड गेम्सचं सिझन 2 चं खरं यश म्हणता येईल.

पहिला सिझन जिथे संपला होता तिथूनच दुसरा सिझन सुरु होतो. गणेश गायतोंडेला तुरुंगातून सोडवण्यात आलं आहे. तो एका समुद्रातल्या बोटीवर आहे. मुंबईला जाण्यासाठी माशासारखा तडफडतो आहे. तर दुसरीकडे आहे सरताज सिंग.. मुंबईवरचा न्युक्लिअर अॅटॅक रोखण्यासाठी त्याच्या परिने लढतो आहे. नव्या सिझनमध्ये बात्या (कल्की कोचलीन ) आणि शाहिद खान (रणवीर शौरी) ही दोन नवी पात्र आहेत. तसंच अमृता सुभाष या मराठमोळ्या अभिनेत्रीनेही तिला मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. कुसुमदेवी यादव अमृता सुभाषने साकारलं आहे. ज्या सफाईदारपणे ती या सिझनमध्ये वावरली आहे त्याला तोड नाही.

 

अमेय वाघ, स्मिता तांबे या दोघांचीही कामं चांगली झाली आहेत. गुरुजी अर्थात पंकज त्रिपाठीची भूमिका या सिझनमध्ये खूप महत्त्वाची आहे. अतापी-वतापीची गोष्ट सांगणारा हा गुरुजी सगळा खेळ कसा रचतो? गणेश गायतोंडेला त्याच्या जाळ्यात कसा ओढतो. गोची (सिझनमध्ये दाखवण्यात आलेली लाल ड्रग्जची गोळी) जगभरात कशी पसरवतो हे सारं पाहणं, अनुभवणं रंजक झालं आहे. गुरुजीची भूमिका ही ऐंशी नव्वदच्या दशकात पेव फुटलेल्या ओशो रजनीशची आठवण करुन देणारी आहे.

गणेश गायतोंडे अफ्रिकेत जाऊन वास्तव्यास राहिला आहे. तिथून त्याला क्रोएशियात आणलं जातं. गुरुजीच्या आश्रमात तो राहतो. इकडे मुंबईतही गुरुजींचा आश्रम आहे. या आश्रमात जाण्याची गरज सरताजलाही वाटू लागते. ओळख लपवून तो गुरुजीच्या आश्रमात जातो तिथे त्याला भेटते ती बात्या. मग दोघांनाही हा खेळ नेमका काय आणि कसा रचला गेला आहे त्याची उकल होत जाते. ज्या पायऱ्या चढून गणेश गायतोंडे वर गेलेला असतो त्याच पायऱ्या उतरुन सरताज सिंग सगळी उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. ती उकल होत जाते.. होत जाते… आणि आपल्याला क्षणोक्षणी सुन्न करत राहते. गुरुजी अर्थात पंकज त्रिपाठीचंही बालपण दाखवण्यात आलं आहे. त्याला तमसयुग संपवून सत्ययुग पुन्हा का आणायचं असतं? त्यासाठी त्याची योजना काय असते? 25 वर्षे त्याने कसली वाट पाहिलेली असते? हे सगळं समजताना, अनुभवताना आपण सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये स्वतःलाही गुंफून घेतो. पंकज त्रिपाठीने ही भूमिका अशा पद्धतीने साकारली आहे की आपण गुरुजीच्या जागी इतर कुणाचा विचारही करु शकत नाही. शब्दांवरची पकड, दुसऱ्याला मुद्दा पटवून देण्याची हातोटी, सात्विक दिसणं, शिव्या ऐकूनही त्यावर शांत राहणं, योगी माणसाच्या चेहऱ्यावर असलेले भाव हे सगळे त्याने चपखलपणे पकडले आहे. गणेश गायतोंडेने काय चुका केल्या आहेत ते आपल्याला दिसतंय. सरताजने त्या करु नयेत असं वाटत असतं.. मग आपल्या अपेक्षा पूर्ण होतात का? तर हो नक्कीच होतात. सरताज सिंग सगळ्या गोष्टींची उकल करतो तरीही शेवट ज्या पद्धतीने करण्यात आला आहे त्याला जवाब नाही.

सरताज सिंगच्या भूमिकेत सैफ अली खानने जान ओतली आहे. तो टॉप टू बॉटम सरताज वाटतो सैफ वाटत नाही हे त्याच्या भूमिकेचं मोठं यश! जी बाब सरताजची ती बाब गणेश गायतोंडेचीही. गणेश गायतोंडे ही भूमिका नवाजुद्दीनच्या आयुष्यातली माईलस्टोन भूमिका आहे यात काहीही शंका नाही. कभी कभी लगता है अपुनही भगवान है! हे म्हणणारा गणेश त्याच्या आयुष्यातले सगळे टप्पे पाहतो. आईचा खून करुन पळालेला गणेश, कुक्कू, सुभद्राला मरताना पाहून अस्वस्थ झालेला चिडलेला गणेश, गुरुजीपुढे बिनधास्त शिव्या देणारा बेदरकार गणेश, गुरुजीला शरण गेलेला गणेश आणि शेवटी आक्रमक झालेला आणि धर्म आणि नशेच्या अंमलाखालून बाहेर आलेला गणेश नवाजने ज्या ताकदीने साकारला आहे त्याला खरोखर जवाब नाही. परुळेकर, भोसले, त्रिवेदी, दिलबाग सिंग, सरताज ही सगळी पात्रं असूनही काकणभर सरस ठरतो आणि हिरो वाटतो तो गणेश गायतोंडेच! अश्वत्थामा है मैं! दुसऱ्या सिझनच्या सातव्या भागात पंकज त्रिपाठी अर्थात गुरुजी आणि गणेश गायतोंडे यांचा एक प्रसंग आहे. तो या दोन्ही अभिनेत्यांनी ज्या ताकदीने साकारला आहे त्याला खरंच तोड नाही. जोजो अर्थात सुरवीन चावलाची भूमिकाही महत्त्वाची आहे. जोजो गायतोंडेच्या आयुष्यात कशी येते? तिला किती आणि कसे महत्त्व आहे. तिच्यावर प्रेम करणारा गायतोंडे ते तिच्या डोक्यात गोळी घालणारा गायतोंडे अशी वेळ काय येते याचीही उत्तरं मिळतात. जोजोच्या भूमिका सुरवीन चावलाने मस्त साकारली आहे. गुरुजी आणि गायतोंडे यांच्यातली एक कडी जोजोही आहे हे आपल्याला समजलेले असते. गायतोंडेला ते कळते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

सरताज सिंगच्या आईचे लाहोरशी असणारे कनेक्शन! शाहीद खानच्या आईवर झालेला अत्याचार. शाहीद खान आणि सरताज यांच्यातला समान धागा या सगळ्या गोष्टी धक्कातंत्राच्या वेगाने आपल्याला अस्वस्थ करत राहतात. जी बाब सरताजच्या आईची तीच वडिलांचीही. दिलबाग सिंगने गणेश गायतोंडेला वाचवलेले असते हे पहिल्या सिझनमध्येच स्पष्ट झाले आहे. दिलबाग सिंगचं गणेश गायतोंडेला गुरु करुन घे असं सांगणं, दोघांची क्रोएशियाच्या आश्रमात झालेली भेट या सगळ्यातून दिलबाग सिंग म्हणजेच सैफचे वडील कसे होते त्यांना गणेश गायतोंडेबाबत, गुरुजींबाबत काय वाटत असतं? हे सगळंही उलगडतं. अफूची गोळी, धर्म, न्युक्लिअर अॅटॅकचा प्लान, मॉब लिंचिंग या सगळ्या गोष्टी भूतकाळ आणि वर्तमान काळात भेटत राहतात. त्यासंदर्भातले प्रसंगही मस्त जमून आले आहेत. यावेळी अनुराग कश्यपच्या जोडीला विक्रमादित्य मोटवानी नाही तर नीरज घायवान आहे. त्यामुळे सैफ असलेल्या भागांमध्ये काही वेळा पकड सैल झाल्यासारखी वाटते. मात्र दुसरा सिझन पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी पेशन्स हवेत. सेक्रेड गेम्सचा अर्थ पवित्र खेळ असा होतो. हा खेळ सुरु झाला आहे… पहिल्या सिझनमध्ये तो कसा संपतो नेमकं काय काय घडतं? या सगळ्याची उत्तरं मिळतात ती दुसऱ्या सिझनमध्ये. काटेकर, बंटी, कांताबाई या सगळ्यांना आपण मिस करत राहतो. बंटीची भूमिका आणखी हवी होती असंही वाटतं. पण सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन पाहून आपण निराश होत नाही.

विशिष्ट संवाद आणि शिव्या या सिझनमध्येही आहेत. सेक्स सीन्सचा पहिल्या सिझन इतका भडीमार नाही. ‘अहम ब्रह्मासी’ ‘मुर्गा चाहिये अपुनको’ ‘चाँदपे हैं मैं’ ‘ये देख यहाँका जुहू बीच, तो जाके कुदजा’ ‘तुझे अश्वत्थामा किसने बनाया?’ ‘त्रिवेदी बचेगा ये पहेली सुलझाओगे तो सारा खेल समझमें आ जाएगा!’ ‘बलिदान देनाही होगा’ ‘तुझे यहाँ बोलनेके लिये नहीं सुननेके लिये बुलाया है!’ ‘मुंबईकी याद आती थी तो सिर्फ दो लोगोंको फोन करता था मैं’ मात्र दुसऱ्या सिझनचा पहिला एपिसोड पाहू लागलो की आता काय होणार? आता काय होणार ही उत्कंठा कायम ठेवण्यात अनुराग कश्यप आणि नीरज घायवान यशस्वी झाले आहेत. सेक्रेड गेम्सच्या सिझन 2 ला मी देतो साडेतीन स्टार्स!

समीर जावळे

sameerjawale@indianexpress.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2019 6:20 pm

Web Title: sacred games 2 review for all eight episodes scj 81
टॅग : Sacred Games 2
Next Stories
1 मी सुद्धा स्वत:ला धार्मिक दाखवणं टाळते- विद्या बालन
2 कोट्यवधींची कमाई करुनही कंगना नेसते ६०० रुपयांची साडी
3 ‘मिशन मंगल’च्या यशानंतर जॉनने दिल्या शुभेच्छा, अक्षयच्या रिप्लायने जिंकली चाहत्यांची मनं
Just Now!
X