‘सेक्रेड गेम्स’ विरोधात दाखल झालेल्या याचिकेत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला दिल्ली हायकोर्टाने सोमवारी दिलासा दिला. आक्षेपार्ह संवादासाठी अभिनेत्याला जबाबदार ठरवता येत नाही असे स्पष्ट करत या याचिकेत अभिनेत्याला प्रतिवादी का केले, असा प्रश्न हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारला आहे.

नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी या वेब सीरिजविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. वेब सीरिजमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या याचिकेवर सोमवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान याचिकेसंदर्भात हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले. ही याचिका कोर्टात टिकू कशी शकेल, असा प्रश्न उपस्थित करताना न्यायाधीशांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. न्यायाधीश म्हणाले, याचिकाकर्त्यांनी मानहानी केल्याचा दावा केला आहे, कलाकारांना प्रतिवादी कसं काय करता येऊ शकते, एखादं मत प्रक्षेपित करण्यापासून आम्ही कसे रोखू शखतो, ते प्रेक्षकांवरच सोडायला नको का? आणि जे भाग प्रक्षेपित झाले आहेत ते कसे काय थांबवणार?.

या याचिकेवरील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.  वेब सीरिजचे आठ भाग प्रदर्शित झाल्याने त्यावर काहीच करू शकत नाही. मात्र, आता या सीरिजचे कोणतेही नवीन भाग प्रदर्शित करू नये असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.