सलमान खानचा आगामी ‘टायगर जिंदा है’ सिनेमा अनेक कारणांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण ऑस्ट्रियामध्ये सुरू आहे. ऑस्ट्रियाचे सध्याचे तापमान उणे २२ एवढे आहे. या एवढ्या कमी तापमानातही सलमान खान आणि कतरिना कैफ अॅक्शन सीनचे चित्रीकरण करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या सिनेमाचे अॅक्शन सीन चित्रीत होत असल्यामुळे या सिनेमाची उत्सुकता अधिक ताणली आहे.

दिग्दर्शक अली अब्बासने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘आम्हाला सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अशा ठिकाणाची गरज होती जी फार शांत असेल. ऑस्ट्रिया हा शांत देश आहे. पण इथे चित्रीकरण करणे अजिबातच सोपे नव्हते. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानची तब्येत बिघडली होती. पण तरीही त्याने सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले.’

असे म्हटले जाते की, सिनेमाचा ट्रेलर ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सलमानचे चाहते हा ट्रेलर पाहण्यास फार उत्सुक आहेत. ट्विटरवर तर सिनेमाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी सतत विचारणा केली जात आहे. यामुळे अल्पावधीत #टायगरजिंदाहैट्रेलर हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला होता. काही दिवसांपूर्वी सलमान आणि कतरिनाचे अॅक्शन सीन करतानाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. सिनेमाचे बहुतांश चित्रीकरण सप्टेंबरमध्येच संपले होते. सिनेमाचा क्लायमॅक्स सीन अबूधाबीमध्ये चित्रीत करण्यात आला होता. तसेच सिनेमाचा काही भाग ऑस्ट्रियाच्या टेरोल राज्यात चित्रीत करण्यात आला आहे.

२२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. वर्ष २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या सिनेमाचा हा सिक्वल आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. तर ‘टायगर जिंदा है’चे दिग्दर्शन अली अब्बास करत आहे. पहिल्या भागात सलमान आणि कतरिनाने टायगर आणि झोया या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.