23 November 2020

News Flash

सलमान म्हणतो, ‘मैंने प्यार किया’च्या यशाचं क्रेडिट लक्ष्मीकांत बेर्डेंना

सलमान भावूक झाला आणि लक्ष्मीकांत यांच्या आठवणींनी त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या

सलमान खान, लक्ष्मीकांत बेर्डे

बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जाणारा सलमान खान ३० वर्षांपूर्वी ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आला. या चित्रपटात भाग्यश्री, आलोक नाथ, रीमा लागू, राजीव वर्मा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही मुख्य भूमिका होत्या. त्याकाळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. इतकंच नाही तर आजही या चित्रपटाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. विशेष म्हणजे हा चित्रपट सुपरहिट होण्यामागे मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मोलाचा वाटा असल्याचं सलमान खानने म्हटलं आहे.

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने सलमानला ‘प्रेम’ ही नवी ओळख दिली. या चित्रपटानंतर त्याच्या करिअरचा आलेख चांगलाच उंचावला. आजवरच्या कारकिर्दीत सलमानने अनेक चित्रपट केले. मात्र ‘मैंने प्यार कियाची जादू’ आजही प्रेक्षकांच्या मनावर आहे. सलमानने काही दिवसांपूर्वी एका डान्स रिअॅलिटी शोच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी एका स्पर्धकाने ‘साजन’ चित्रपटातील ‘तुमसे मिलने की तमन्ना है’ या गाण्यावर नृत्य सादर केलं. हे गाणं ऐकल्यानंतर सलमान भावूक झाला आणि लक्ष्मीकांतच्या आठवणींनी त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.

”साजन’ चित्रपटातील ‘तुमसे मिलने की तमन्ना है’ या गाण्याच्या माझ्याकडे खूप आठवणी आहे. हे गाणं माझं इंट्रोडक्शन सॉन्ग होतं आणि या गाण्यात माझ्यासोबत लक्ष्मीकांत होते. ‘साजन’ चित्रपटाव्यतिरिक्त आम्ही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे आम्ही खूप घनिष्ट मित्र झालो होतो. विशेष म्हणजे ‘साजन’प्रमाणेच ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट ठरण्यामागे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मोलाचा वाटा आहे”, असं सलमानने यावेळी सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “मैंने प्यार किया’ हा चित्रपट आणि ‘साजन’मधील ‘तुमसे मिलने की तमन्ना.. ‘ हे गाणं कायम मला लक्ष्मीकांतच्या आठवणींमध्ये घेऊन जातं. दुर्दैवाने आज लक्ष्मीकांत आपल्यात नाहीत”.

दरम्यान, सलमान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार असून अभिनेत्री कतरिना कैफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 9:44 am

Web Title: salman khan laxmikant berde one of the reasons maine pyar kiya hit
Next Stories
1 चित्र रंजन : मोदी, मोदी आणि मोदीच!
2 विश्वचषकामध्ये निक देणार टीम इंडियाला पाठिंबा
3 अमोल कोल्हेंच्या विजयावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे दिग्दर्शक म्हणतात..
Just Now!
X