बॉलिवूडमधील अनेकांचा गॉडफादर असलेल्या अभिनेता सलमान खानने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आहे. गेल्या वर्षी सलमानने त्याच्या मेहुण्याला आयुष शर्माला ‘लवयात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर आता तो लवकरच त्याच्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटातून दोन नव्या चेहऱ्यांची बॉलिवूडला ओळख करुन देणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रत्येकामध्ये उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतं. तत्पूर्वी या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यासोबतच ट्रेलर लॉन्चची तारीख ही जाहीर करण्यता आली.

नितीन कक्कड दिग्दर्शित ‘नोटबुक’ या चित्रपटाची निर्मिती सलमान खान करत असून या चित्रपटातून मोहनीष बहल यांची मुलगी प्रनुतन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्यासोबतच जहीर इक्बाल स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे जहीरचादेखील हा पहिलाच चित्रपट आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर जहीरने ट्विटरवर ते शेअर केला आहे.

माझ्या कारकिर्दीमधील हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे त्याविषयी मी प्रचंड उत्सुक आहे. कदाचित पहिल्या प्रेमात पडल्यानंतरही मी एवढा एक्साईट नसेल तेवढा या चित्रपटासाठी आहे. ‘नोटबुक’चा ट्रेलर येत्या २२ फेब्रुवारीला तुमच्या भेटीला येत आहे, असं कॅप्शन जहीरने दिलं आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एक ‘नोटबुक’ दाखविण्यात आली असून त्याच्या एका पानावर जहीर तर दुसऱ्या पानावर प्रनुतन दिसून येत आहे. या दोघांचाही हा पहिल्याच चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच संपूर्ण बॉलिवूड सेलिब्रिटींचं लक्षही या चित्रपटाकडे वेधलं आहे.