छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत राहणारा ‘बिग बॉस’ या शोचं यंदाचं १४ वं पर्व चांगलंच चर्चेत आलं आहे. जुन्या आणि नव्या स्पर्धकांसह या शोमध्ये रोज नवनवीन वाद, टास्क प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. यामध्येच आता टीव्ही विश्वातील बिनधास्त गर्ल कविता कौशिक हिने बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली आहे. त्यामुळे सध्या या शोची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खानदेखील कविता कौशिकचा मोठा चाहता असून खुद्द त्यानेच या गोष्टीचा खुलासा केला आहे.
छोट्या पडद्यावरील ‘एफआयआर’ या मालिकेमुळे कविता घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने चंद्रमुखी चौटाला ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे याच भूमिकेमुळे सलमान खान कविताचा चाहता झाला असून त्याने बिग बॉसच्या सेटवर हे मान्य केलं. अलिकडेच रंगलेल्या विकेंड वॉरमध्ये सलमानने कविताचा चाहता असल्याचं सांगितलं.
“एफआयआर या मालिकेचा मी किती मोठा चाहता आहे हे तर तुम्हाला माहितच आहे. मी हे कायम म्हणत आलोय की, आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्रीने कवितासारखी महिला पोलिसांची भूमिका साकारलेली नाही”, असं सलमान म्हणाला.
दरम्यान, सलमानने केलेली ही स्तुती ऐकून कविताने त्याचे आभार मानले. अलिकडेच कविता कौशिकने वाइल्ड कार्डच्या माध्यमातून बिग बॉस 14 मध्ये प्रवेश मिळवला असून सध्या ती घराची कॅप्टन आहे. तिच्यासोबतच अभिनेत्री नैना सिंहनेदेखील बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 2:39 pm