बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लॉकडाउनमध्ये देखील स्वस्त बसलेला नाही. अलिकडेच त्याची ‘प्यार करोना’ आणि ‘तेरे बिना’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली. ही दोन्ही गाणी स्वत: सलमानने लिहिली होती व त्यानेच गायली होती. या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सलमान आता एका चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी तो नव्या कलाकारांचे कास्टिंग करत असल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण स्वत: सलमानने दिलं आहे.

नेमकं काय म्हणाला सलमान?

“सलमान खानच्या कुठल्याही नव्या चित्रपटासाठी सध्या कास्टिंग सुरु नाही. आम्ही कुठल्याही एजंटकडे नवे कलाकार शोधण्याची जबाबदारी सोपवलेली नाही. आपण या संबंधीत कुठल्याही मॅसेज किंवा इमेलवर विश्वास ठेवू नये. अशा अवफा पसरवणाऱ्यांविरोधात सलमान खान फिल्म कंपनी कायदेशीर कारवाई करणार आहे.” अशा आशयाचे ट्विट सलमान खानने केलं आहे.

सलमानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमानच्या नव्या चित्रपटासाठी कास्टिंग सुरु नाही हे वाचून काही चाहत्यांना दु:ख देखील झाले आहे. तसेच काही चाहत्यांनी या ट्विटसाठी सलमानचे आभार देखील मानले आहेत.