गेल्या वर्षांच्या अखेरीस ‘टायगर जिंदा है’ हा सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची जादू ओसरत नाही तोवर दिग्दर्शक अली अब्बास जफरने सलमानसोबतच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाची घोषणा केली. २०१९ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान सलमान एक, दोन नाही तर पाच वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.

जूनमध्ये ‘भारत’च्या शूटिंगला सुरुवात होणार असून यामध्ये वयाच्या आठव्या वर्षापासून ६५ वर्षांच्या वृद्धापर्यंतचा काळ सलमानच्या भूमिकेत साकारणार आहे. वयातील हे वेगवेगळे टप्पे दाखवण्यासाठी तो विविध पाच लूकमध्ये दिसणार असल्याची माहिती अली अब्बास जफरने दिली. प्रोस्थेटिक मेकअप म्हणजेच चेहरेपट्टी बदलूनच टाकणारा मेकअप आणि स्पेशल इफेक्ट्सचा वापर करून या पाच वेगवेगळ्या लूकची किमया साधली जाणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यासाठीची तयारी सुरू होईल.

वाचा : जाणून घ्या, शाहरुखने ‘पद्मावत’ला का दिला होता नकार?

यामध्ये सलमानचा लूक ‘मैंने प्यार किया’मधील प्रेमसारखा दिसेल असेही म्हटले जात आहे. चित्रपटाचे निर्माते अतुल अग्निहोत्री असून दिल्ली, पंजाब, स्पेन आणि अबुधाबी याठिकाणी शूटिंग होणार आहे.