बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत झाला आहे. सध्या त्याच्या प्रेमात फक्त त्याचे चाहते नाही तर सिनेसृष्टीतले दिग्दर्शकही आहेत. सगळ्यात व्यस्त अभिनेता म्हणून आज रणवीरकडे पाहिले जाते. त्याच्या तारखा मिळवणे हे कोणत्याही दिग्दर्शकासाठी तारेवरची कसरतच असते. पण एका दिग्दर्शकाला मात्र यात यश आलेले दिसत आहे. ‘ट्युबलाइट’चा दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी सिनेमात सलमान काम करणार आहे. कबीर सध्या ‘ट्युबलाइट’च्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचे काम संपताच तो सलमानसोबत पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाचे चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटवर आधारीत असेल असेही बोलले जाते. १९८३ मध्ये भारताने जो विश्वचषक जिंकला होता. या विषयावर आता कबीर सिनेमा करण्याच्या विचारात आहेत. अतुल अग्निहोत्री आणि अलविरा अग्निहोत्री या सिनेमाची निर्मिती करणार असून सलमाननेच या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी कबीरचे नाव पुढे केले होते.

डिएनए या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सलमानला कबीरवर एक दिग्दर्शक म्हणून पूर्ण विश्वास आहे. ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमांनंतर त्याचा हा विश्वास अजून दृढ झाला. दोघं ट्युबलाइट या सिनेमाला घेऊनही फार सकारात्मक आहेत. आता जर त्यांनचा हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर सलमान लवकरच एका खेळाडूच्या व्यक्तिरेखेत दिसेल. याआधीही त्याने खेळाडूची भूमिका निभावली आहे. याशिवाय बॉलिवूडमध्येही क्रिकेटशी निगडीत अनेक सिनेमे आले आहेत. अक्षय कुमार, आमिर खान आणि इमरान हाश्मी यांसारख्या कलाकारांनी अशा सिनेमात काम केले आहे.

यावर्षीही क्रिकेटशी निगडीत अनेक सिनेमे आले होते. माजी कर्णधार मोहम्मद अजरुद्दीन, एकदिवसीय संघाचा आणि टी२० चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमे बनले आहेत. यात सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर बनवलेला सिनेमा अजून प्रदर्शित झालेला नाही. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर बनलेल्या ‘एमएस धोनी: दि अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जागतिक स्तरावर सुमारे २०० कोटींची कमाई केली होती. हा सिनेमा यावर्षी ३० सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. नीरज पांडे याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते तर सुशांतसिंग राजपूतने यात मुख्य भूमिका वठवली होती.