दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने २१ मे रोजी त्याच्या ‘साहो’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटातून प्रभास बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या साहो चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यातच चित्रपटात प्रभाससह सलमान खान दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. हा सलमानच्या चाहत्यांसाठी सुखद धक्काच असणार आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटात पाहुण्याकलाकराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. सलमानने अद्याप या भूमिकेसाठी होकार कळवलेला नाही. ‘साहो’ चित्रपटात नील नितीन मुकेश खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

‘साहो’ चित्रपटासाठी दिग्दर्शक सुजीत यांनी ३०० कोटींची गुंतवणूक केली आहे. तसेच चित्रपटातील स्टंटसाठी हॉलिवूड दिग्दर्शक केनी बेट्स यांची नेमणुक करण्यात आली आहे. दरम्यान, प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून ‘साहो’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साहो’ हा चित्रपट तेलुगु आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.