दिलीप ठाकूर
सलमान खानने ‘हीरो'(२०१५), ‘बजरंगी भाईजान'(२०१५), ‘ट्यूबलाइट'(२०१७) या चित्रपटांच्या निर्मितीपाठोपाठ आता ‘रेस ३’ पासून आणखीन एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलयं, ते म्हणजे, चित्रपट वितरण. चित्रपट व्यवसायातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट. तुम्हालाही माहित्येय की, केवळ वितरकच न लाभल्याने प्रत्येक वर्षी हिंदी व मराठीसह किमान पंचवीस-तीस टक्के चित्रपट प्रदर्शितच होत नाहीत. त्यांचे पुढे नेमके काय होते हेदेखील अनेकदा समजत नाही. चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजेच वितरक. हा वितरकच चित्रपटगृह चालक आणि मल्टिप्लेक्स कंपन्या यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर चित्रपट आणतो.

सल्लू ही व्यावसायिक खेळी हुशारीने जिंकेल अशी आपण आशा करुयात. तो ‘क्राऊड पुलर स्टार’ आहे. त्यामुळेच तो याबाबत काहीसा सेफच आहे. एखाद्या ‘ट्यूबलाइट ‘ची गर्दी वेगाने ओसरली तरी तोपर्यंत या चित्रपटानेही भरपूर व्यवसाय केलेला असतो. गंमतीत म्हणायचे तर, टायगर श्राॅफच्या हिट चित्रपटापेक्षाही सल्लूचा फ्लाॅप चित्रपट जास्त व्यवसाय करतो. सल्लूपूर्वीही काही स्टार चित्रपट वितरणात उतरलेत.
आशा पारेख तर योगायोगाने चित्रपट वितरणात आली. नासिर हुसैन यानी ‘तिसरी मंझिल ‘ ( दिग्दर्शक विजय आनंद) निर्माण करतानाच स्वतः दिग्दर्शन करीत ‘बहारो के सपने’ पूर्ण केला. ‘तुमसा नही देखा'(१९५७)पासूनच नासिर हुसैन चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनात यशस्वी .पण ‘बहारो के सपने'(१९६७) एक तर कृष्ण धवल अर्थात ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपट. तोही काहीसा गंभीर. राजेश खन्नाचा हा ‘राज’, ‘आखरी खत’नंतरचा चौथा-पाचवा चित्रपट. तोपर्यंत त्याच्या नावाला ग्लॅमर आले नव्हते. आशा पारेख मात्र लोकप्रिय होती. पण तेवढ्यावर या चित्रपटाला वितरकच मिळत नव्हते. अखेर नासिर हुसैन यानी आशा पारेखला आपण सोबतच चित्रपट वितरण सुरु करुया सुचवले आणि त्यातून त्यानी ‘जेम्स मुव्हीज’ ही वितरण संस्था स्थापन केली. नासिर हुसैन यांचे ‘यादो की बारात’, ‘हम किसीसे कम नही’ इत्यादी चित्रपट आणि त्यांचे बंधु ताहिर हुसैन यांचे ‘अनामिका’ वगैरे चित्रपट जेम्सनेच प्रदर्शित केले.

‘आराधना'(१९६९) सुपर हिट ठरवल्यावर निर्माता-निर्देशक शक्ती सामंता व राजेश खन्ना मित्र झाले आणि ‘अमर प्रेम’पासून त्यानी भागीदारीत ‘शक्तीराज फिल्म’ ही वितरण कंपनी स्थापन केली. त्यांच्या दोन विशेष गोष्टी सांगायलाच हव्यात. राजेश-डिंपल यांच्या लग्न सोहळ्याची त्यानी शाॅर्ट फिल्म बनवली व आपल्या वितरणातील ‘अनुराग’सोबत दाखवली. हा चित्रपट शक्तीदांचाच होता. पण बासू भट्टाचार्य यांच्या ‘आविष्कार’मध्ये मानधनाशिवाय अभिनय करताना या चित्रपटाचे वितरणाचे हक्क घेऊन घसघशीत यश मिळवल्याची चर्चा खूपच गाजली. राजेश व शर्मिला टागोर या चित्रपटात पती-पत्नीच्या भूमिकेत होते. या नात्यातील विसंवादाची ही गोष्ट होती.

चित्रपट वितरणातही या कलाकारांनी काही वैशिष्ट्ये जपली. विनोद खन्ना व विनोद मेहरा यानी एकत्र येऊन ‘कमला फिल्म’ ही वितरण कंपनी स्थापन करून ‘कुर्बानी’, ‘कुदरत’ असे काही चित्रपट प्रदर्शित केले. मानधनाच्या बदल्यात चित्रपटाचे वितरण हक्क ही भूमिका यातूनच विकसित झाली. अमिताभ बच्चनने ‘एथनिक फिल्म’ ही वितरण संस्था त्यातूनच निर्माण केली. त्याचे दिल्लीत कार्यालय होते.
राजेंद्रकुमार चित्रपट वितरणात उतरल्याचाही किस्सा आहे. एकदा राजेंद्रकुमार व कुमार गौरव हे पिता-पुत्र चेन्नईला (तेव्हाचे मद्रास) गेले असताना त्यांनी एका चित्रपटगृहात ‘पुष्पक’ पाहिला आणि कमल हसनचा हा चित्रपट मुंबईत आपण वितरित करण्याचा निर्णय त्यानी लगोलग घेतला. आणि त्यानी ‘डिंपल रिलीज’ अशी आपली वितरण संस्था स्थापून मेट्रो चित्रपटगृहात (अर्थातच तेव्हाचे) ‘पुष्पक’ झळकवून यश मिळवले. आपली ही गोष्ट खुद्द राजेंद्रकुमारने आपल्या बंगल्यावरील ‘फूल’च्या पार्टीत आम्हा सिनेपत्रकारांना खुलवून सांगितली. चित्रपट वितरणाकडे फक्त एक व्यवसाय म्हणून न पाहता आवडीनेही पाह्यला हवे हेच यातून जाणवले. अजय देवगणने चित्रपट वितरणात पाऊल टाकताना त्याने चित्रपट वितरणाची मक्का नाझ चित्रपटगृह इमारतीतच पाऊल टाकले (इतर स्टारची वितरण कार्यालये या परिसरात होती. जेम्सचे नाझमध्येच होते) त्याने पूर्वीच्या ‘बसंत पिक्चर्स’चे ऑफिस घेऊन आपले ‘देवगन एन्टरप्रायझेस’ सुरु केले. तो स्वतः नाझमध्ये आला आणि कारभार समजून घेतला.

स्टार चित्रपट वितरणात उतरतो तेव्हा तो आपला कार्य विस्तार करतो. या क्षेत्रातील अनुभवी व दूरदृष्टीची माणसे नेमतो. याचे प्रमुख कारण एकच, आपल्याच चित्रपटाच्या वितरणात खेळी चुकलीच तर मानधनही जाते आणि गुंतवणूकही जाते. दुहेरी फटका बसण्याची शक्यता जास्त असते. पण त्याच वेळेस त्या स्टारला आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रियाही अनुभवता येते. सलमान खानने सारासार विचार करूनच चित्रपट वितरणात पाऊल टाकले असणार आणि त्यात त्याला आपल्या वडिलांचा सल्ला व आपला दीर्घानुभव याचा फायदा होईलच.