27 May 2020

News Flash

हुश्श.. सलमान ईदचा मुहूर्त साधणार..

पुढच्या वर्षी ईदला ही जोडगोळी ‘वाँटेड’चा सिक्वल घेऊन येणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अली अब्बास जफर आणि घरचा निर्माता अरबाज खान यांनी सलमान खानची या वर्षीची चिंता मिटवली होती. या वर्षी अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो चांगला चालला. आता वर्षांचा शेवटही भाईच्याच तिसऱ्या ‘दबंग’गिरीने होणार आहे. त्यामुळे या वर्षी सलमान खान खुशीत असला तरी पुढच्या वर्षी काय?, ही चिंता त्याला सतावत होती. खासकरून संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांना एकत्र आणणारा ‘इन्शाहअल्ला’ हा चित्रपट बासनात गेल्यावर आणि ‘किक’ला थोडा वेळ लागणार हे साजिद नाडियादवालांनी जाहीर केल्यावर तर चाहत्यांनीच सलमानला हा प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. अखेर सगळ्या गोष्टींवर सलमानला कारकीर्दीत संजीवनी मिळवून देणाऱ्या ‘वाँटेड’ दिग्दर्शक प्रभुदेवा यानेच पुन्हा एकदा यशमंत्र दिला आहे. पुढच्या वर्षी ईदला ही जोडगोळी ‘वाँटेड’चा सिक्वल घेऊन येणार आहेत.

सलमानच्या दोन चित्रपटांचे पोस्टर्स आणि ट्विटरवर त्याखाली असलेला चाहत्यांसाठीचा त्याचा संदेश यातून ईदला प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सलमानला चांगल्या चित्रपटाची किती गरज होती आणि त्यासाठी त्याने काय काय धडपड केली असेल, याची प्रचीती येते. सलमानने ‘दबंग ३’ आणि नव्याकोऱ्या ‘राधे’चे पोस्टर्स ट्विटरवर टाकले आहेत. आपने पूछा था ना.. ‘दबंग ३’के बाद क्या? असा प्रश्न विचारत त्याचं उत्तरही सलमानने ‘यह ईद राधे की’ म्हणत उत्तरही दिलं आहे. इतकेच नाही तर यूटय़ूबवरही याची जाहिरात करण्यात आली असून ‘हम ख्रिसमस भी मनाएंगे और ईद’ भी असं म्हणत या दोन्ही चित्रपटांची झलक प्रकाशित करण्यात आली आहे. हा इतका सगळा खटाटोप करण्याचे कारण म्हणजे, सलमान खान आणि भन्साळी हे न जमलेले समीकरण म्हणता येईल.

‘हम दिल द चुके सनम’ चित्रपटानंतर सलमानने भन्साळी यांच्या ‘सावरिया’ चित्रपटात छोटेखानी भूमिका केली होती. मात्र त्यानंतर ही जोडी ‘बाजीराव मस्तानी’च्या निमित्ताने एकत्र येणार होती, ती आलीच नाही. अखेर मधली काही वर्षे शत्रुत्व जपल्यानंतर ‘ईन्शाहअल्ला’ या चित्रपटासाठी हे दोघे आणि जोडीला अलिया भट्ट असे समीकरण एकत्र येणार होते. मात्र पुन्हा माशी शिंकली आणि चित्रपट पुढे जाण्याऐवजी त्याचा गाशाच गुंडाळण्यात आला. तोवर भाईने ‘किक’चा सिक्वल हाताशी येईल अशी कल्पना केली होती. मात्र त्याच्या पटकथेवरच काम सुरू असून त्याला खूप वेळ लागेल, असे खुद्द दिग्दर्शकाने जाहीर केल्याने तोही मार्ग उरला नाही. दरम्यानच्या काळात सलमान खानने प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकचीही घोषणा केली होती. मात्र त्यावरही काही जमले नाही. राधे ही त्याची व्यक्तिरेखा ज्या चित्रपटामुळे हिट झाली त्या ‘तेरे नाम’च्या सिक्वलचीही चर्चा सुरू झाली. मात्र अजून त्यासंदर्भात फार काही झालेले नाही, असे सतीश कौशिक यांनीही स्पष्ट केले. अखेर शोधाशोध आणि प्रयत्नानंतर प्रभुदेवाच्या मदतीने ‘आपका वाँटेड भाई’ राधेचा शोध लागला आहे. या वर्षांच्या अखेरीला नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा ‘दबंग ३’ही प्रभुदेवानेच दिग्दर्शित केला आहे. आणि आता ‘राधे’ ही तोच दिग्दर्शित करणार आहे. हा या जोडीचा एकत्रित तिसरा चित्रपट ठरणार आहे, अर्थात सलमानच्या या चित्रपटासाठी कोरिअन चित्रपट ‘द आऊटलॉज’चा आधार घेण्यात येणार असल्याचे समजते. असो.. सध्या तरी सलमान खानच ईदला येणार म्हणून त्याची आणि त्याच्या चाहत्यांचीही चिंता मिटली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:37 am

Web Title: salman khan wanted movie sequel eid abn 97
Next Stories
1 ‘काम मोजकेच, पण चांगले हवे’
2 हिरकणी..
3 चित्रचाहूल : ‘लगीनघाई’ आणि ‘मांडव खोडय़ा’
Just Now!
X