‘सुलतान’ या आपल्या आगामी चित्रपटातील मार्गदर्शकाची भूमिका संजय दत्तने साकारावी, अशी चित्रपटातील मुख्य अभिनेता सलमान खानची इच्छा असल्याचे समजते. अभिनेता संजय दत्त याला अली अब्बास जफर यांच्या ‘सुलतान’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी खुद्द सलमान खानने आदित्य चोप्रांकडे विनंती केल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. सध्या पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत तुरुंगवासातून मुक्तता होण्याची शक्यता आहे.
सलमान खान संजय दत्तला ‘सुलतान’ चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहे. चित्रपटातील या भूमिकेस तो योग्य न्याय देऊ शकेल, याची सलमानला खात्री आहे. संजय दत्तदेखील बॉलीवूडमधील आपल्या पुनरागमनासाठी फार उत्सुक आहे. संजय दत्तला चित्रपटात सामावून घेतल्याने कायदेशीर अडथळा निर्माण होऊन चित्रपटाचे प्रदर्शन लांबणार नाही ना याबाबत आदित्य चोप्रा विचार विनिमय करत असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे म्हटले आहे.
सलमान खान आणि संजय दत्त दोघांनी २००० मध्ये ‘चल मेरे भाई’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर २०११ मध्ये ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून दोघांनी एकत्र काम केले होते. आता ‘सुलतान’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोघे एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.