करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मेणबत्ती किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले होते. मात्र काही अतिउत्साही लोकांनी चक्क मशाली पेटवल्या. सोशल डिस्टंसचे नियम झुगारुन गर्दी करत मशाली पेटवणाऱ्या या लोकांवर अभिनेत्री संध्या मृदुल हिने प्रतिक्रिया दिली आहे. “पणत्या लावा पण आपल्या घरीच…” असं म्हणत तिने आपला संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाली मृदुल?

मशाली पेटवून गो करोनाच्या घोषणा देणाऱ्या लोकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लोकांना एका भाजपा आमदारानेच प्रोत्साहन दिल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओवर संध्याने प्रितिक्रिया दिली आहे.

“खरं तर हे माझं शेवटचं ट्विट आहे. आपल्याला मशाल नव्हे दिवा पेटवायला सांगितला होता. ते देखील आपल्या घरातच राहून. पण ही मंडळी रस्त्यावर उतरली आहेत. यांच्यावर कारवाई होणार का?” अशा आशयाचे ट्विट करुन संध्याने आपला संताप व्यक्त केला आहे. संध्या मृदुलचे हे ट्विट करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

संध्या मृदुल एक चित्रपट अभिनेत्री आहे. ‘साथिया’, ‘पेज थ्री’, ‘रागिनी एमएमएस २’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ‘झलक दिखलाजा’ या रिअॅलिटी डान्स शोमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. या शोच्या दुसऱ्या पर्वात ती रनरअप ठरली होती. सध्या ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे जास्त चर्चेत असते.