करोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. लॉकडाउन घोषित केल्यामुळे अनेक उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. परिणामी, हातावर पोट असणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यातच मुंबईतील कंपन्या, कॉर्पोरेट ऑफिसदेखील बंद असल्यामुळे मुंबईतील डबेवाले यांच्यावरही सध्या आर्थिक संकट कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या डबेवाल्यांसाठी अभिनेता सुनील शेट्टी आणि संजय दत्त मदतीसाठी पुढे आल्याचं पाहायला मिळालं.

सुनील शेट्टी आणि संजय दत्त या दोघांनी मुंबईतील डबेवाल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी डबेवाल्यांमध्ये गरजेच्या वस्तू आणि किराणा सामानाची काही पाकिटे पुरवत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही कलाकार मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या सहकार्याने हे कार्य करत आहेत. अलिकडेच अस्लम शेख यांनी ट्विट करुन मुंबईच्या डबेवाल्यांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांचं हेच ट्विट सुनील शेट्टीने रिट्विट करत त्यांना ‘या कामात आणखी यश मिळो’,असं म्हटलं आहे.

“मुंबईची जान #Dabbawalas यांना आता आपल्या मदतीची गरज आहे. #PremachaDabba म्हणजेच आपल्या डबेवाल्या भावांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यासाठी संजय दत्त, सुनील शेट्टी, रेडिओ सिटी इंडिया आणि मला जॉइन व्हा. @STCI_Mumbai मध्ये शक्य होईल तितकी मदत करा”, असं ट्विट अस्लम शेख यांनी केलं होतं. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर सुनील शेट्टीनेदेखील रिट्विट करत, “तुम्हाला या कार्यात यश मिळो. फार स्त्युत्य उपक्रम आहे अस्लम भाई”, असं सुनीलने म्हटलं आहे.

दरम्यान, या किराणा सामानाच्या पाकिटांमध्ये तांदूळ, डाळ, साखर, पीठ,तेल यांचा समावेश असणार आहे. तसंच अन्य काही सामानाचादेखील समावेश असेल असं सांगण्यात येत आहे.