प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.  भन्साळी लवकरच कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘गंगुबाई काठीयावाडी’ असं आहे.  हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई यांच्या जीवनाभोवती चित्रपटाची कथा फिरताना पाहायला मिळणार आहे.गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. येथे आल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. त्या येथील महिलांना आर्थिक मदत करतात, त्यासोबतच त्यांच्या हक्कासाठीही लढा देतात. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. हे सारं काही ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाची कथा हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटसाठी प्रथम प्रियांका चोप्राला दिग्दर्शकांची पसंती असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता संजय लीला भन्साळी यांनी आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. परंतु आलियासोबत कोणता कलाकार स्क्रीन शेअर करणार हे स्पष्ट झालेलं नाही. या चित्रपटाची निर्मिती पेन इंडिया आणि भन्साळी प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येणार आहे.