News Flash

ब्लॉग : जमाना चरित्रपटांचा

दीडशे-पावणेदोनशे मिनिटात बरेच काही मांडणे आव्हानात्मक.

सामान्यांपेक्षा वेगळे आयुष्य जगलेल्या व्यक्तींच्या जिवनातील झंझावात, वादळ, थरार इत्यादी मोठ्या पडद्यावर अनुभवायची प्रेक्षकांना उत्सुकता असते.

दिलीप ठाकूर
तुम्हालाही माहित्येय की, सध्या मोठ्या प्रमाणात चरित्रपट निर्माण होत असून त्याबाबतची एकूणच उत्सुकता वाढत चालल्याचे सामाजिक-सांस्कृतिक वातावरण आहे. त्यात विविधताही केवढी तरी आहे हे तीन चित्रपटांवरुन स्पष्ट होतेय. संजय दत्तच्या संघर्षमय वादळी जीवनावरील ‘संजू’ ( रणवीर कपूर)
शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील १९६५ ते १९९५ या कालावधीतील आव्हानात्मक वाटचालीतील त्यांचे कणखर नेतृत्व व दूरदृष्टीवरील ‘ठाकरे’ ( नवाऊद्दीन सिद्दीकी)  आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई : व्यक्ती की वल्ली? ‘ ( सागर देशमुख) हे चरित्रपट आपल्याला रुपेरी पडद्यावर तीन भिन्न क्षेत्रातील व्यक्तिमत्वाना साकारुन आपले अनुभव विश्व समृद्ध करतील. (येथे केवळ उदाहरणांसाठी तीनच नावे घेतली. सर्वच चरित्रपटांची नावे द्यायची तर ती सूची होईल. )

रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी ‘ (१९८३) हा आपल्याकडचा सर्वोत्कृष्ट चरित्रपट असल्याचे अनेकांचे मत आहे. हा विदेशी दिग्दर्शकाचा भारताच्या लोकनेत्यावरील चरित्रपट भरपूर अभ्यास, संशोधन, मेहनत, खर्च आणि कसदार अभिनय या गुणांवर दर्जेदार चित्रपट बनू शकला. ‘गांधी’च्या यशाने प्रेरणा घेऊन आपल्याकडील काही दिग्दर्शकांनी ‘नेहरु’, ‘सरदार’ इत्यादी चरित्रपट निर्माण केले पण ते ‘गांधी’ चित्रपटाची उंची गाठू न शकल्याने चरित्रपट हे आपल्या चित्रपटसृष्टीला पेलवणारे नाहीत असाच काहीसा समज झाला. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यातील लोकनेत्यांच्या आयुष्यावर चरित्रपट असावेत असाही तेव्हा समज असावा.

दरम्यान चित्रपटसृष्टी विविध स्तरावर कात टाकून नवीन रुप धारण करत असतांना चरित्रपटाची निर्मिती हा मोठाच घटक अधोरेखित झाला. आता विविध क्षेत्रातील ‘हीरो’ अर्थात यशस्वी व्यक्तीमत्व अथवा वादळी आयुष्य वाट्याला आलेल्या व्यक्तिंवर प्रामुख्याने चरित्रपट निर्माण होऊ लागले. त्यात क्रीडा क्षेत्राला जास्त पसंती दिली गेल्याचे दिसते. भाग मिल्खा भाग (फरहान अख्तर),  धोनी-अनटोल्ड स्टोरी (सुशांतसिंग रजपूत) याना खणखणीत यश मिळाले. दर्जेदार चरित्रपटासाठी  काही गोष्टींचा प्रमुख वाटा असतो. दिग्दर्शकाला त्या क्षेत्राची माहिती असणे, त्यात सखोल अभ्यास करणे, व्यक्तिरेखेनुसार कलाकार निवडणे आणि त्या कलाकाराने ती व्यक्तीरेखा व ते क्षेत्र समजून घेणे. त्यासाठी भरपूर वाचनाची तयारी ठेवणे. पटकथाकाराने हे क्षेत्र व आणि व्यक्तिमत्त्व याची अधिकाधिक माहिती आणि संदर्भ मिळवून ते दृष्य माध्यमातून कल्पकतेने मांडणे. चरित्रपट साकारणे विविध स्तरावर कमालीचे आव्हानात्मक असते. एक प्रकारे हे इतिहासात डोकावणेही असते. त्यामुळे तपशील चुकवून चालत नाहीत, अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात.

चरित्रपटात असा इतिहास व या क्षेत्राचे वातावरण निर्माण करावे लागते. म्हणजेच कलादिग्दर्शन व कॉम्प्युटर ग्राफिक्स या दोन्ही स्तरांवर चोख काम करणे आवश्यक. ‘ठाकरे’ चित्रपटात साठ-सत्तरच्या दशकातील मुंबई दिसेल. पु. लं. देशपांडे यांच्यावरील चित्रपटातील  पु. लं. कितपत परफेक्ट दिसतात याकडे जुन्या पिढीतील प्रेक्षकांचे लक्ष राहिल. तात्पर्य, काही चरित्रपटांबाबत प्रेक्षक अधिकच जागरुक, चौकस, संवेदनशील असतात. ‘डर्टी पिक्चर’मधील विद्या बालनने सिल्क स्मिथाचे अतिशय धाडसी आयुष्य प्रभावीपणे साकारले पण सिल्क स्मिथाची ‘कातिल नजर’ विद्या बालनकडे नाही. थेट नजर हे सिल्क स्मिथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होय. असेच संजय दत्तबद्दल सांगायचे तर त्याच्या चेहऱ्यावर कुठेतरी किंचित  उदास भाव जाणवतो  (तो प्रतिकूल परिस्थितीतून आला असावा)  पण त्याच्या धष्टपुष्ट शरीरामुळे ते जाणवत नाही. रणवीर कपूरने मेकअपने संजय दत्ताचा ‘चेहरा’ घेतला असले पण संजूच्या चेहर्‍यावरील वेदना आणि बेफिकीरीपणा यांचे अजब रसायन त्याने कसे वठवले असेल याबाबत चित्रपटाचा ट्रेलर पाहून शंका येते.

चरित्रपटापुढचे आणखीन एक महत्त्वपूर्ण आव्हान म्हणजे दीडशे-पावणेदोनशे मिनिटात बरेच काही मांडणे. ‘गांधी’ सव्वातीन तासाचा चित्रपट होता. त्या काळात सेन्सॉर प्रमाणपत्रावर रिळे किती ते देत. आता मिनिटे देतात. आजचा शहरी प्रेक्षक बर्‍याचदा तरी शंभर- सव्वाशेच मिनिटाचा चित्रपट पाहू इच्छितोय. त्याना दीर्घ चरित्रपटात गुंतवून ठेवणे दिग्दर्शकाचे मोठेच कसब आहे आणि ही विविध क्षेत्रातील कर्तबगार तसेच वादळी आयुष्य जगलेली माणसे तर इतकं उंच-सखल आयुष्य जगतात की त्यांना न्याय देण्यासाठी अथवा त्यांचे जीवन पडद्यावर साकारण्यासाठी ‘चित्रपटाची मालिका’ अर्थात सिक्वेल निर्माण करावे लागतील. ऐवीतेवी ‘रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’ या मसाला चित्रपटाचे तीन-चार भाग येतात तर काही व्यक्तिमत्वांचेही पाच-सहा चरित्रपट येऊ देत.

सचिन तेंडुलकरच्या चरित्रपटाचे स्वरूप या सगळ्यात वेगळेच. त्यात सचिनचा मैदानी पराक्रम व कौटुंबिक आणि विविध सोहळ्यातील तो याचे भरपूर फुटेज जमा करून मग त्यावर दिग्दर्शनीय संस्कार व संकलाकाचे कौशल्य यांनी आकार आणून भरपूर  माहितीचा रंजक चरित्रपट घडवला. तो चित्रपटाप्रमाणे पूर्ण लांबीचा होता आणि त्यात ‘सचिन तेंडुलकर’ एक कुटुंबवत्सल व्यक्ती, एक क्रिकेटर, एक ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर अशी सगळीच रुपे प्रभावीपणे पडद्यावर आली. चरित्रपटाचे हे वेगळे रुप असून अशा पध्दतीने व्हिडिओ फुटेज वापरुन चरित्रपट निर्मिण्याचा मार्गही रास्त आहे. खुद्द ती व्यक्तीही आपल्या फ्लॅशबॅकमध्ये जात अनेक गोष्टींवर फोकस टाकत हा चरित्रपट अधिकच माहितीपूर्ण व रंजक बनवू शकते. सचिन तेंडुलकरनेही तेच केले.

सामान्यांपेक्षा वेगळे आयुष्य जगलेल्या व्यक्तींच्या जिवनातील झंझावात, वादळ, थरार इत्यादी मोठ्या पडद्यावर अनुभवायची प्रेक्षकांना उत्सुकता असली तरी मुख्यत्वे करून दिग्दर्शकाचे कसब आणि चित्रपटातील प्रमुख कलाकारासह अन्य कलाकारांच्या अभिनयावर चरित्रपटाचे यश अवलंबून असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 3:40 pm

Web Title: sanju thackeray bhai vyakti ki valli marathi movie biopic blog by dilip thakur
Next Stories
1 Big Boss Marathi: घरातले दाभोळकर, साळुंखे, डिसुझा माहित आहेत का?
2 पु.ल. देशपांडे यांचा राज ठाकरेंनी सांगितलेला किस्सा वाचलात का?
3 ‘कुमकुम’ फेम जुही-सचिन अखेर या दिवशी विभक्त होणार!
Just Now!
X