News Flash

भाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री!

चित्रपट किंवा रंगभूषेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना संतोष गिलबिले यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलंय

मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये रंगभूषाकार म्हणून स्वतःचा ठसा उमटवलेले रंगभूषाकार संतोष गिलबिले यांची आता बॉलिवूडमध्ये एंट्री होत आहे. बहुचर्चित मणिकर्णिका या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलाय. चित्रपट किंवा रंगभूषेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना संतोष गिलबिले यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलंय.

रंगभूषा म्हणजे काय हे माहीत नसण्यापासून हिंदीत रंगभूषाकार म्हणून मानाने काम करण्यापर्यंतची मजल संतोष यांनी मारलीय. संतोष यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई-वडिलांची भाजीची गाडी होती. त्या गाडीवर भाजी विकण्यासाठी संतोष बसायचे. तशाही परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर कला मंडळात प्रवेश घेतला. सुरुवातीला एकांकिकांमधून छोट्या छोट्या भूमिका केल्या. पण अल्पावधीतच अभिनय हा आपला प्रांत नाही हे त्यांना कळून चुकलं. पण, तोपर्यंत नाटकानं मनात घर केलं होतं. एकदा नाटक पहायला गेलेले असताना त्यांनी त्यांच्या मित्राला कलाकारांची रंगभूषा करताना पाहिलं आणि तिथं त्यांच्या मनात रंगभूषेचं बीज पेरलं गेलं. त्यांनी बालनाट्यांपासून रंगभूषा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक नाटकं, मराठी चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषा केली. केवळ रंगभूषाच नाही, तर रंगभूषाकार (मेकअप डिझायनर) म्हणूनही नाव कमावलं. अमर फोटो स्टुडिओ सारखी नाटकं, किल्ला, एक हजाराची नोट, रिंगण, देऊळ, चि. व चि.सौ.का, शाळा, राक्षस, सलाम, यंग्राड, बाबू बँड बाजा आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी मेकअप डिझायनर म्हणून काम केलं आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

मेकअप करणं आणि मेकअप डिझाईन करणे यात फरक आहे. लेखक दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेली व्यक्तिरेखा उभी करणं हे आव्हानात्मक काम आहे. कारण त्यात भौगोलिक स्थिती, शारीरिक ठेवण, काळ या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय नाटक आणि चित्रपट ही दोन्ही माध्यमं वेगळी आहेत, हे ओळखून काम करावं लागतं. चित्रपटात विशेष काळजी घ्यावी लागते. कारण कॅमेरा खोटं बोलत नाही. केलेलं काम प्रेक्षकांना अगदी जवळून दिसतं, असं संतोष सांगतात.

“मणिकर्णिका” हा अत्यंत आव्हानात्मक चित्रपट होता. पहिला हिंदी चित्रपट म्हणून थोडं दडपणही होतं. मात्र, हा चित्रपट करताना खूप मजा आली. त्यात काय केलं आहे, हे प्रत्यक्ष पडद्यावर पहायला मिळेलच.. मात्र बालनाट्य ते हिंदी चित्रपट हा प्रवास खूप काही देणारा ठरला, अशी भावनाही ते आवर्जून व्यक्त करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 3:29 pm

Web Title: santosh gilbile make up man mani karnika
Next Stories
1 डोंबिवली रिटर्न’चा वेगवान आणि लक्षवेधी टीजर लाँच
2 ‘ललित २०५’ मालिकेत संक्रांतीचं अनोखं सेलिब्रेशन
3 #GullyBoy : रणवीर म्हणतोय, ‘अपना टाईम आएगा’
Just Now!
X