सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जेव्हा साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हापासूनच या दोघांचं नाव जोडलं जातं. आगामी ‘लव्ह आज कल २’ या चित्रपटात हे दोघं एकत्र कामसुद्धा करत आहेत. या चित्रपटाच्या सेटवरील काही व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सारा-कार्तिक बाइक राइड करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पण याच व्हिडिओमुळे सारा ट्रोल झाली आहे.

या व्हिडिओत कार्तिक बाइक चालवत आहे आणि त्याच्यामागे सारा बसली आहे. दिल्लीतल्या शूटिंगचा हा व्हिडिओ आहे. पण साराने हेल्मेट न घातल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. सेलिब्रिटी असून वाहतूक सुरक्षेचे नियम न पाळणं हा बेजबाबदारपणा आहे असं एका युजरने म्हटलंय. तर बाइकवर मागे बसले असतानाही हेल्मेट घालणं गरजेचं आहे, असंही एकाने म्हटलंय.

https://www.instagram.com/p/BvGxmi6AS6_/

याआधी ‘लव्ह आज कल २’मधील सारा-कार्तिकचा किसिंग व्हिडिओ व्हायरल झाला होता. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. २००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. या चित्रपटात सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुडासुद्धा भूमिका साकारत आहे. पंजाब आणि दिल्लीत याची शूटिंग पार पडणार आहे.