प्रार्थना बेहरे
खरं तर मला दिवाळीविषयी फारस काही वाटत नाही. पण यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूपचं स्पेशल आहे. यंदा माझी ताई भारतात येणार असून, तब्बल १२ वर्षांनंतर माझ्यासोबत ती दिवाळी सेलिब्रेट करणार आहे. विशेष म्हणजे तिच्या बाळाची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळी साजरा करण्याचा आनंदच वेगळा आहे. माझे आई-बाबा, ताई-जीजू आणि माझा छोटासा भाचा असं संपूर्ण कुटुंब दिवाळीच्या फराळाचा आनंद लुटणार आहोत. मी माझ्या भाच्यासोबत खूप सारे फटाके फोडणार आहे. त्याची ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे मी काहीचं कमी पडू देणार नाही. त्यानंतर आम्ही सर्वजण दिवाळीत काश्मीरला फिरायला जाणार आहोत.
दिवाळीत डायटचा मी अजिबात विचार नाही करत. मला असं वाटत दिवाळीचे फक्त पाचचं दिवस असतात. त्यामुळे आपल्याला जे काही आवडेल ते सगळ खावं. तेलकट, गोड काहीही खा आणि दिवाळीचा आनंद घ्या. कारण बंधन आणून कधीच दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही. आता माझे शूट नाही आहे त्यामुळे मला खाण्याचं बंधन नाही. पण जरी मला कोणत्या चित्रपटाचे शूटींग करायचे असते तरीही मी दिवाळीत अजिबात विचार केला नसता. मनोसोक्त दिवाळीच्या फराळाचा आनंद लुटा आणि दिवाळी साजरी करा.

शब्दांकन- चैताली गुरव