|| नीलेश अडसूळ

करोनाकाळात मनोरंजनसृष्टीला प्रकाशवाट दाखवणारा परिसंवाद

मार्च २०२० मध्ये आलेल्या करोनाचे नाना रंग वर्षभरात विविध क्षेत्रांनी अनुभवले. व्यावसायिकदृष्ट्या परिपक्वअसल्याने इतर क्षेत्रे कदाचित लवकर सावरली गेली. पण मनोरंजन या जीवनावश्यक गरजांमधील सर्वात शेवटचा घटक असल्याने या क्षेत्राची जास्तच फरफट झाली. त्यातही एकीचे बळ दाखवून मालिकाजगत पुढे सरसावले. पण नाटक, प्रयोगात्मक कला, चित्रपट यांची घडी अद्यापही सुरळीत झालेली नाही. मनोरंजन क्षेत्रातील याच स्थित्यंतराचा आणि भविष्यातील आव्हानांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न ‘मनोरंजनसृष्टी सद्य:स्थिती-परिवर्तन एक कसोटी’ या परिसंवादातून घेण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी विनय आपटे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे नुकताच हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ‘सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढला तर या संकटावर मात करत मनोरंजनसृष्टी नक्की उभारी घेईल’ असा आत्मविश्वाास परिसंवादात उपस्थित दिग्गज कलाकारांनी व्यक्त केला.

‘करोनामुळे आलेली संकटे हा पूर्णविराम नव्हे तर स्वल्पविराम आहे. यातून मार्ग नक्कीच निघेल, पण उपाययोजनेसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. ही लढाई वाद, स्पर्धा बाजूला ठेऊन लढायला हवी,’ अशी एकवाक्यता यावेळी दिसून आली. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे, चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव, लेखक-दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री सुलेखा तळवलकर, निर्माते नितीन वैद्य, ज्येष्ठ जाहिरातकार भरत दाभोळकर आदी नाटक, चित्रपट, मालिका, ओटीटी, जाहिरात जगतातील मान्यवर चर्चेसाठी उपस्थित होते.

‘व्यवसाय म्हणून नाटक कसे टिकवायचे हा मूळ आणि मोठा प्रश्न आहे. नाटक उत्तम लिहूनसुद्धा प्रयोग झाले नाही तर तो लेखक नाटकाकडे का येईल, हीच अवस्था अभिनेता – दिग्दर्शकांची आहे. इथल्या अनियमिततेमुळे इथे राहून काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टीने नाटकाकडे पाहायला हवे,’ असा नाट्यविचार ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी मांडला. तर ‘जेव्हा थांबण्याचा प्रसंग येतो, तेव्हा मोठी उलथापालथ होत असते. पण लवकरच या काळावर मात करून सगळेजण जोमाने कामाला लागतील. पहिल्या टाळेबंदीत जाहिरात क्षेत्राला मोठा फटका बसला. कंपन्यांनी जाहिरात देणेच बंद केले होते. अनेकांचे रोजगार गेले, कलाकारांना कामे मिळत नव्हती. पण जाहिरात ही गरज असल्याने हे क्षेत्र तितक्याच जलद गतीने उभे राहिले,’ असे ज्येष्ठ जाहिरातकार भरत दाभोळकर यांनी सांगितले.

‘पहिल्या लाटेत मालिका क्षेत्राला भीषण परिणामांना तोंड द्यावे लागले. यातूनच धडा घेत दुसऱ्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन मोट बांधण्याचा निर्णय घेतला. त्याच एकीने राज्याबाहेर जाऊन चित्रीकरण केले आणि त्याच एकीने पुन्हा आम्ही राज्यात परतलो. पुढेही असा काळ येऊ शकतो पण मार्ग काढण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे,’ असे सूतोवाच ज्येष्ठ निर्माते नितीन वैद्य यांनी केले. तर मालिकांना ओटीटीपासून धोका नाही. ओटीटीवरच्या आशयाला अनेक आर्थिक आणि सांस्कृतिक मर्यादा असल्याने घराघरांत पोहोचलेल्या दूरचित्रवाणीला धक्का लागणार नाही, असेही ते म्हणाले. याच विचारांना तरुण लेखक – दिग्दर्शक सतीश राजवाडे यानेही दुजोरा दिला. तर अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी ‘यूट्यूब’ या नव्या माध्यमातून लोकांपर्यंत कसे पोहोचायचे याचे तंत्र उलगडले. यासह मनोरंजन क्षेत्रापुढील आव्हाने, ओटीटी, प्रेक्षक कल, अर्थगणिते, आगामी नियोजन यावरही चर्चा करण्यात आली. या परिसंवादाचे प्रास्ताविक वैजयंती आपटे यांनी केले तर या चर्चेला दिशा देत दुवा साधण्याचे काम ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांनी केले.

नाटकात काही बदल गरजेचे

नाटकाच्या मूळ स्वरूपात काळानुसार काही बदल करणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी सुचवले. सध्या ओटीटी माध्यम हातात आहे हे लक्षात घेऊन ओटीटीसाठी नाटकांचे चित्रीकरण करताना नाटक अधिक सशक्ततेने पोहोचवण्यासाठी त्याला ‘टेली-प्ले’चा बाज द्यावा लागतो. त्याही माध्यमातून नाटक उत्तम पोहोचते. ओटीटीवर नाटक पाहणारा मोठा वर्ग असल्याने उद्या कदाचित तो नाट्यगृहातही येईल, त्यामुळे बदल स्वीकारायला हवा, असा मुद्दा केंकरे यांनी मांडला. मराठी भाषेविषयी असलेली वाङ्मयीन गोडी कमी होत चालल्याने मराठी राज्यात मराठी ही तिसरी भाषा ठरते, हे दुर्दैव आहे. मुलांना वाङ्मयाची आवड निर्माण झाली तर नाटक जगेल, असे मत त्यांनी व्यक्त के ले. सध्या लांबचा प्रवास करून नाटक पाहायला येणे सध्या लोकांना शक्य नसल्यामुळे प्रत्येक उनगरात नाट्यगृहे उभी राहिली तर प्रेक्षक वाढतील. त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सुचवले. शिवाय, तरुणांपर्यंत नाटक पोहोचवण्यासाठी वर्तमानपत्रांसोबतच ऑनलाइन माध्यमांचा, त्यांच्या हातात असणाऱ्या अ‍ॅप्सचा आधार घ्यायला हवा, असा मुद्दाही केंकरे यांनी मांडला.

‘नाटकाचा ‘अर्थ’विचार ’

सवलती मागणे हा केवळ तात्पुरता पर्याय आहे, नाटकाचे अस्तित्व टिकवायचे असेल त्या पुढचा विचार करायला हवा. करोनामुळे ५० टक्केच उपस्थितीला परवानगी असल्याने येणारे उत्पन्नही अर्धेच मिळणार हे निश्चिात आहे. मग त्या दृष्टीने गणित आखायला हवे. थोडक्यात अर्थकारण बदलायला हवे. नाटकाचा खर्च, स्वरूप यातून हे साधेल. कदाचित आता नाही पण येणाऱ्या नाटकांना हे सूत्र लागू करावे लागेल. नाटकांची प्रेक्षकांना सवय लागायला हवी, यासाठी नाटक त्यांच्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या संकल्पना आणायला हव्यात. – विजय केंकरे, ज्येष्ठ रंगकर्मी

 

‘राज्याने विचार करावा ’

राज्य सरकारने आजतागायत मालिका क्षेत्राला कधीही मदतीचा हात दिला नाही. जागेचा प्रश्न, पायाभूत सुविधा यापासून हे क्षेत्र आजही वंचित आहे. कठीण काळात मार्ग काढता आला असता, पण तसे न झाल्याने निर्मात्यांना बाहेरची वाट धरावी लागली. हीच धोक्याची सूचना आहे. उद्या इतर राज्यांमधून माफक दारात, सुसज्ज सुविधेसह चित्रीकरण स्थळे उपलब्ध झाली तर वाहिन्या, निर्माते क्षणात तिथे पोहोचतील. हे महाराष्ट्रासाठी तोट्याचे ठरेल. – नितीन वैद्य, निर्माते

 

‘शिकवणारा काळ’

जाहिरात क्षेत्राला शिकवण देणारा हा काळ होता. जाहिरातींचे युग आल्याने अनेक जाहिरात कंपन्यांनी दर खूप वाढवले होते. म्हणजे ५ लाखांत होणाऱ्या जाहिरातीला अगदी २० लाख रुपये आकारून मनमानी केली जात होती. पण करोनामुळे कामच थांबल्याने त्यांनाही शून्यातून सुरुवात करावी लागेल. वास्तवाचे भान देणारा हा काळ आहे. – भरत दाभोळकर, ज्येष्ठ जाहिरातकार

 

‘अर्थ’भाषा बदलेल’

मराठी चित्रपटाकडे प्रेक्षक येत नाहीत ही टाळेबंदीच्या आधीपासूनची अडचण आहे. मराठीत आशयपूर्ण चित्रपट निर्माण झाला तर प्रेक्षक येतील असे म्हणत होते, पण अनेक आशयघन चित्रपटांना प्रतिसाद न मिळाल्याने तोही अंदाज खोटा ठरला. आता नेमका कसा चित्रपट तयार करायचा हा प्रश्न आहे. आता तर करोनामुळे प्रेक्षक येतील का याचीच खात्री नसल्याने बजेटही मोडून पडेल. त्यामुळे येत्या काळात टिकून राहण्यासाठी चित्रपटाची अर्थ भाषा बदलेल. -संजय जाधव, चित्रपट दिग्दर्शक

 

‘परिस्थिती हाताळण्याचे तंत्र उमगले’

मालिका सुरू ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन दिलेला लढा महत्त्वाचा वाटतो. मालिकांचे व्यवस्थापन कसे करावे, हे या काळात शिकता आले. कारण अनेक अडचणी येत असताना वेळेत भाग तयार करणे, लोकांपर्यंत पोहोचवणे ही कसरत होती. यासाठी झालेले सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. राज्याबाहेर जाऊन चित्रीकरण करताना कलाकारांनीही मोठा पाठिंबा दिला. त्यामुळे हे क्षेत्र थांबले नाही. परिस्थिती हाताळण्याचे तंत्र करोना काळात उमगले. – सतीश राजवाडे, लेखक-दिग्दर्शक

 

‘तरुण प्रेक्षक तयार होतोय’

करोनाकाळात अनेकांनी समाजमाध्यमांचा आधार घेत आपल्या संकल्पना मांडल्या. हे एक सशक्त माध्यम आहे. विशेष म्हणजे तुम्ही जितके भरभरून द्याल तितका प्रतिसाद तुम्हाला मिळतो. ‘दिल के करीब’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मीही मनोरंजन क्षेत्रातल्या दिग्गजांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मनोरंजन क्षेत्राकडे नवी पिढी झेपावते आहेत. कारण ते स्वत: प्रेक्षक आहेत. वाहिन्यांवर सुरू असलेल्या आशयाची जाण त्यांना आहे. त्यामुळे चाळिशीच्या चौकटीबाहेर जाऊन वाहिन्यांना तरुण प्रेक्षक मिळणे ही सुखावणारी बाब आहे. – सुलेखा तळवलकर, अभिनेत्री