News Flash

बेताल बहू..

आपल्यापासून दूर कुठे तरी असलेल्या, आपल्या मनोरंजनासाठी काम करणाऱ्या कलाकारांना दोष देणे योग्य आहे का याचा विचार व्हायला हवा.

|| निलेश अडसूळ

दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या मालिका मोबाइलच्या माध्यमातून आता प्रत्येकाच्या हातात आल्या आहेत. त्यामुळे एरव्ही मालिकांविषयी घराघरांत चालणाऱ्या चर्चा आता थेट समाजमाध्यमांमार्फत चव्हाटय़ावर येऊ लागल्या आहेत. इंटरनेटची स्वस्ताई आणि घरबसल्या विरंगुळ्याचे साधन झालेल्या समाजमाध्यमांवर मत मांडण्याची चढाओढ दिवसेंदिवस दृढ होताना दिसते आहे. एखाद्या विषयातील ज्ञान नसतानाही केवळ मत मांडणे म्हणजे काय हे पु. ल. देशपांडे यांनीही मार्मिकपणे लिहिले आहे. त्यामुळे ही शैली जुनीच आहे. फक्त कालानुरूप त्यावर संस्कार किंवा विकार जडत आहेत. सध्या अनेक प्रेक्षक समाजमाध्यमांवर मालिकेतील आशयावर बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत.

मालिकेचा विषय, आशय, पात्र, पात्रांचे स्वभाव, राहणीमान यावर वाहिनी, निर्मिती संस्था, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार महिनोन्महिने काम करत असतात. आज मालिका ठरली आणि उद्या प्रदर्शित झाली इतका सोपा कारभार कोणत्याही कलेबाबतीत घडत नाही. एखाद्या कथेवर संस्कार करताना त्यांचे चालू घडीशी असलेले संदर्भ, लोकांचा कल, मानसिकता, प्रसिद्धी या सगळ्याचा सारासार विचार केला जातो. अर्थात त्यात ‘टीआरपी’ कशी मिळेल याचा विचार प्राधान्याने होतोच आणि तो व्हायलाच हवा, कारण लाखो रुपये खर्च करून जेव्हा एक भाग तयार केला जातो, तेव्हा तो जास्तीत जास्त पाहिला जावा, वाखाणला जावा ही एवढीच अपेक्षा असते. हा आता त्या अपेक्षेची पूर्तता करताना काही वेळा कथेचा तोल जातो, आशय भरकटतो. ते निदर्शनास नक्कीच आणून द्यायला हवे; पण ते करताना  प्रेक्षक ‘सुजाण’ असतो याचे भान असायलाच हवे, कारण विवेक सोडून भाष्य करताना ते आपल्या नावासहित जात असते, ज्यातून वास्तवातले आपले संस्कार लोकांपुढे येत असतात.

एकंदर समाजमाध्यमांचा अभ्यास केला तर अशा लोकांची काय अडचण असते हेच कळत नाही. म्हणजे एखादे पात्र सोशीक असेल, त्याचीही लोकांना अडचण, खलनायकी असेल तर त्याचीही लोकांना अडचण आणि चांगले असेल तर इतके चांगले कसे याचीही अडचणच. मग नेमके दाखवायचे काय यासाठी कदाचित अशा बहाद्दरांना वाहिन्यांनी दत्तकच घ्यावे लागेल. हल्ली बारा वर्षांच्या मुलांपासून ते शंभरीपर्यंतचे कुणीही या समाजमाध्यामंवर सक्रिय असतात. ज्या कलाकारांविषयी आपण भाष्य करतो त्यांचे आईवडील, कुटुंबीयही ते पाहत असतील, वाचत असतील याचे तारतम्य प्रेक्षक म्हणून नक्कीच असायला हवे, अशी भावना कलाकारांकडूनही व्यक्त होते आहे.

‘झी’ मराठी वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत शशांक केतकर सध्या खलनायकाची भूमिका साकारतो आहे. आजवर प्रमुख नायकाची भूमिका साकारणाऱ्या शशांकने या मालिकेत आपल्या अभिनयाचा कस लावून खलनायकी पात्र इतक्या प्रभावीपणे केले आहे की अभिनयविश्वात त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे; परंतु दुसरीकडे मात्र एका प्रेक्षकाने काही दिवसांपूर्वी या मालिकेतील होळीच्या दृश्यावर अश्लील भाषेत प्रतिक्रिया दिली. त्यावर शशांकनेही त्याला उत्तर देत कलाकारही प्रतिक्रिया देऊ शकतात हे दाखवून दिले. हा केवळ एक प्रातिनिधिक प्रसंग आहे, याआधीही मालिका, चित्रपट जगतातील कलाकारांना अशा बेताल प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. काही कलाकारांनी याच गोंधळाला वैतागून समाजमाध्यमांकडे पाठही फिरवली आहे, तर काहींनी दुर्लक्ष करण्याचे कसब आत्मसात के ले आहे.

सध्याच्या काही मालिकांचा आढावा घेतला तर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील खलनायिका मालविका आणि सोशिक नलू यांच्याविषयीही बरीच चर्चा आहे. एवढेच नव्हे मालिकेत स्वीटूच्या घरात असलेल्या गरिबीवरही लोकांनी बोट ठेवले आहे, तर ‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध या पात्राच्या नकारात्मक बाजूवर, तर इशाच्या वागण्यावरही लोकांना आक्षेप आहे. इशा हे पात्र बालिश आहे, बेजबाबदार आहे, या वयाची मुले अशी नसतात यावर नाना प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याच वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेबाबतीत तेच. मालिकेतील नायिका कीर्ती, इतकी सुशिक्षित आहे तर अन्याय का सहन करते, हल्लीच्या कोणत्या मुली अशा वागतात आणि बरेच काही. ‘अशा मालिकांमधून मुलांना आपण काय संस्कार देणार आहोत’ अशा बहुतांशी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात. त्या वेळी संस्कार घडवण्यासाठी मालिका हे एकमेव माध्यम उरले आहे का, असा प्रश्न पडतो.

मालिका प्रत्येकाला आपल्या वाटतात हा भाग वेगळा, पण आभासी जगाची वास्तवाशी गाठ बांधून त्यावर चिखलफेक करणे गैर. आपल्याला कुणी अरेचे कारे केलेले चालत नाही. मग आपल्यापासून दूर कुठे तरी असलेल्या, आपल्या मनोरंजनासाठी काम करणाऱ्या कलाकारांना दोष देणे योग्य आहे का याचा विचार व्हायला हवा. मुळात आपण कलाकार असतो आणि त्या नायकाच्या किंवा खलनायकाच्या जागी आपण काम करत असतो तर अशा प्रतिक्रिया पाहून, वाचून काय वाटले असते, आपण भूमिका नाकारली असती का, की कलाकार म्हणून त्याला न्याय दिला असता, असे अनेक प्रश्न प्रेक्षक म्हणून आपण स्वत:ला विचारायला हवेत. कारण आपण प्रेक्षक नाही तर ‘सुजाण’ प्रेक्षक आहोत.

‘मनोरंजन करणे हे कठीण काम’

लोकांचे मनोरंजन करणे हे अत्यंत कठीण काम आहे. विशेषत: मालिका साकारत असताना प्रेम, जिव्हाळा, नाटय़, रंजकता, खल या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून कथानक घडत असते. ज्यात सर्व स्तरांतील प्रेक्षकांचा विचार केला जातो. त्यामुळे मालिकेचा जो खरा प्रेक्षकवर्ग आहे तो कायम त्या कलाकृतीचा आनंद घेत असतो. उद्या एखाद्या गृहिणीने येऊन मला ‘मालिकेतला अमुक एक प्रसंग नाही आवडला’ असे सांगितले तर मी त्याचा नक्कीच विचार करेन; पण समाजमाध्यमांवर नको त्या भाषेत मत मांडणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही, कारण त्यांची संख्या मूठभर आहे. अशांना कितीही चांगला आशय दिला तरी ते समाधानी होत नाहीत. किंबहुना अशा प्रतिक्रिया देणे हेच त्यांचे काम झाले आहे. – अजय मयेकर, दिग्दर्शक

 

‘दुर्लक्ष हाच पर्याय’

राजकारण, क्रिकेट आणि मनोरंजन या तीन घटकांवर लोक कायमच भाष्य करत असतात. प्रत्येकाचे काही ना काही मत असतेच, जे त्याला मांडायचे असते. मालिकांच्या बाबतीत सांगायचे झाले तर समाजमाध्यमाने काही गोष्टी चांगल्याही केल्या आहेत. जसे की लोकांना जे आवडत नाही त्यावर ते बोलतात आणि आपल्यालाही त्याची दखल घेता येते. बऱ्याचदा माझ्या मालिकेबाबत लोकांना खटकणाऱ्या गोष्टींवर आम्ही चर्चाही करतो. समाजमाध्यम म्हटले की जितके चांगले लिहिणारे लोक, तितकेच वाईट लिहिणारेही असतात. आपण कुणाचेही हात धरू शकत नाही, त्यामुळे मर्यादा सोडून दिलेल्या प्रतिक्रियांवर दुर्लक्ष हा एकमेव पर्याय आहे. आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचे. – मनवा नाईक, निर्माती

‘टीका करा, पण मर्यादेचे काय..’

आपली मालिका आपण किती चांगल्या पद्धतीने मांडू शकतो यासाठीच प्रत्येक लेखक-लेखिका प्रयत्न करत असतात. मालिका म्हटले की रंजकता आली आणि ती आणण्यासाठी विविध नाटय़मय घटना आम्ही लिहीत असतो. त्या लिहीत असताना कायम मर्यादा राखूनच लिहिल्या जातात; पण आपण कितीही चांगला आशय लिहिला तरी त्यावर बोट ठेवणारा नवा गट तयार झाला आहे. विशेष म्हणजे समाजमाध्यम आपल्या हातात आहे, तर काही तरी भाष्य करायचे हा ट्रेंड झाला आहे. यात केवळ कलाकारच नाही तर लेखक, दिग्दर्शक यांनाही नको त्या शब्दात बोलले नाही. मुळात लेखक, दिग्दर्शक, कलाकार ज्या तळमळीने काम करतात असतात याचा अंदाज कुणालाही नसतो. ज्या कलाकारांवर प्रेम करता त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक कशी होऊ शकते याचा मी आजही विचार करते. प्रेक्षक म्हणून तुम्हाला टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे; पण त्या करताना भाषेची मर्यादा असायला हवी.    – रोहिणी निनावे, लेखिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 12:13 am

Web Title: series through television series through mobile akp 94
Next Stories
1 ‘थलायवी’ची गर्जना फु काचीच..
2 भ्रमाचा भोपळा
3 ओटीटी हेच भविष्य
Just Now!
X