तो आला आणि त्याने जिंकलं.. बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने १९८८ मध्ये अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्याचा प्रवास अजूनही सुरूच आहे. इंडस्ट्रीतील या २७ वर्षांत शाहरुखने असंख्य चाहते कमावले. इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक शाहरुख असून त्याने आतापर्यंत ८० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

शाहरुखने या इंडस्ट्रीत २७ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’, ‘रईस’ ही त्याची गाजलेली चित्रपटे आहेत. या २७ वर्षांत शाहरुखची संपत्तीसुद्धा वाढली आहे. ‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ या वर्षात शाहरुखची एकूण संपत्ती सुमारे ४१ अब्ज ६३ कोटी रुपयांच्या घरात आहे.

वांद्रे इथल्या शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची किंमत आता जवळपास २०० कोटी रुपये इतकी आहे. ६००० चौरस फुटांच्या ‘मन्नत’ बंगल्यात बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहे. अलिबागमध्येही शाहरुखचा फार्महाऊस आहे. दुबईमध्ये शाहरुखचा ‘व्हिला के ९३’ हा बंगला आहे तर लंडनमधील पार्क लेन इथंसुद्धा त्याचं घर आहे. ही संपत्ती जवळपास १६७ कोटी रुपयांची आहे.

किंग खानला महागड्या व आलिशान गाड्या विकत घेण्याची आवड आहे. ‘ऑडी A6’, ‘बीएमडब्ल्यू i8’, ‘बीएमडब्ल्यू 7 सीरिज’, ‘हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट बॉब’ ‘बेंटली कॉन्टिनेंटल जीटी’ अशा महागड्या गाड्या त्याच्याकडे आहेत.

‘कोलकाता नाइट रायडर्स’ या आयपीएलमधील संघाचा तो सहमालक आहे. शाहरुखचे ५५ टक्के शेअर्स त्यात असून त्याची किंमत सुमारे ५७५ कोटी रुपये इतकी आहे. शाहरुखच्या ‘रेड चिलीज’ या निर्मिती कंपनीची वार्षिक उलाढाल ५०० कोटींच्या आसपास आहे.