दिग्दर्शक-निर्माता-अभिनेता करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात एकत्र स्क्रिन शेयर केल्यानंतर बॉलीवूड बादशहा शाहरुख खान आणि रणबीर कपूर हे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. विशेष म्हणजे ते एका आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. रशियन निर्माता अॅलेक्से पेट्रूहिन याच्या ‘वीआयवाय: जर्नी टू इंडिया’ या चित्रपटात हे दोन्ही भारतीय कलाकार काम करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अॅलेक्से याने त्याच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी शाहरुख आणि रणबीरशी संपर्क साधल्याचे कळते. अॅलेक्सेने इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही शाहरुखला चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी आणि सह निर्माता म्हणून विचारणा केली आहे. त्याच्याकडून आता होकार येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. चित्रपटासाठी आम्ही रणबीरचीही निवड केली असून त्यालाही विचारणा केली आहे. आम्हाला रणबीर आणि शाहरुखला चित्रपटात एकत्र आणायचे आहे. ‘वीआयवाय: जर्नी टू इंडिया’ हा चित्रपट वीआयवाय सिरीजमधील तिसरा चित्रपट असेल. या सिरीजमधील ‘वीआयवाय २: जर्नी टू चायना’ या दुस-या चित्रपटात जॅकी चॅन आणि आरनॉल्ड यांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाविषयी बोलताना अॅलेक्से म्हणाला की, भारत आणि रशिया या दोन्ही देशांना जवळ आणण्याचा प्रयत्न म्हणजे जर्नी टू इंडिया. हा एक भव्य चित्रपट असून याचा बजेट जवळपास ४० मिलियन यूएस डॉलर इतका असेल. या चित्रपटात शाहरुखला घेण्याविषयी तो म्हणाला की, चित्रपटसृष्टीत मक्तेदारी असलेल्या कलाकाराला त्याच्या स्वतःच्या निर्मिती संस्थेसह चित्रपटात समाविष्य करून घेण्याचा आमचा विचार होता. चायना चित्रपटाच्यावेळी आम्ही जॅकी चॅनची निवड केली होती. तसेच, त्याची स्वतःची निर्मिती संस्थाही आहे. यावेळी आम्ही शाहरुखला विचारणा केली असून तो नक्कीच या चित्रपटासाठी होकार देईल असे आम्हाला वाटते.

सध्या अॅलेक्से भारतात असून त्याने ऑपेरा हाऊस येथे झालेल्या रशियन चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.