यूट्यूब हे संकेतस्थळ तरुणाईमध्ये फारच लोकप्रिय आहे. यूट्यूबवर येणाऱ्या वेबमालिकांमुळे आणि कॉमेडी एपिसोड्समुळे अनेकजण तासन् तास यूट्यबवर सर्फिंग करताना दिसतात. म्युझिक, रेसिपी यासाठीही यूट्यूब सतत धुंडाळलं जातं. कांदा चिरण्यापासून रेड कार्पेट मेकअपपर्यंत आणि शू लेस बांधण्यापासून ते सॉफ्टवेअर कोडिंगपर्यंत लाखो व्हिडीओजचा संग्रह आपल्याला युट्यूबवर पाहावयास मिळतो. प्रोफेशनल यूटयूबर किंवा फुल टाईम यूटयूबर आहे असं सांगणाऱ्यांकडे हल्ली तरुणाईच्या जगात प्रचंड आदराने आणि उत्सुकतेने पाहिलं जातंय. यातीलच एक नाव म्हणजे ‘लिली सिंग अका सुपरवुमन’. तिची एक झलक दिसावी, सही घेता यावी किंवा तिच्याबरोबर सेल्फी घेता यावा म्हणून लिलीच्या चाहत्यांची झुंबड उडते. अशी ही नेटिझन्समध्ये प्रसिद्ध असलेली सुपरवुमन लवकरच बॉलिवूड बादशहा शाहरुख खानच्या घरी भेट देणार आहे.
याआधीही लिलीने मुंबईला भेट दिली होती. तेव्हाही ती शाहरुखच्या घरी गेलेली. त्याची मुलगी सुहाना खान ही लिलीची खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात तीन शहरांच्या दौऱ्यावर भारतात येणारी लिली यावेळीही शाहरुखच्या घरी जाणार असल्याचे वृत्त ‘मिड-डे’ या संकेतस्थळाने दिले आहे. लिलीसाठी त्याने ‘मन्नत’ या त्याच्या बंगल्यावर एका खास कार्यक्रमाचे आयोजन केल्याचेही कळते. येत्या १९ एप्रिलला मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये लिली तिच्या चाहत्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिलला ती अनुक्रमे हैद्राबाद, नवी दिल्ली या शहरांना भेट देईल. या भारत दौऱ्यात तिच्या ‘हाऊ टू बी अ बोझः अ गाइड टू कॉन्करिंग लाइफ’ या तिच्या पहिल्या पुस्तकाच्या माध्यमातून ती जीवनाकडे विनोदी आणि प्रेरणादायी नजरेने कसे पाहावे याबद्दल सांगणार आहे. या टूरमध्ये लिलीची स्टॅण्डअप कॉमेडी पाहायला मिळणार असून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहायचे याचेही काही नवे फंडे ती सांगेल.
लिली २०१४ साली मुंबईत आलेली तेव्हा सुहाना आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून तिला ‘मन्नत’वर आमंत्रित केले होते. त्यावेळी शाहरुखने लिलीसाठी खास तयार करून घेतलेला ब्लेझर भेट स्वरुपात दिला होता. तसेच, आपल्या मुलांप्रमाणे मीही तुझा फॉलोअर असल्याचे शाहरुखने तिला सांगितले होते. शाहरुख लिलीला म्हणालेला की, मला जेव्हा झोप येत नाही तेव्हा मी तुझे व्हिडिओ बघतो. यावर चकित झालेल्या लिलीने, डूड…. तू जे आता बोललास ते मी रेकॉर्ड करून माझ्या मोबाइलची रिंगटोन ठेवू का? असे म्हटल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. युट्यूबच्या या सुपरवूमनला भेटण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उत्सुक आहेत. पण लिली पहिल्यांदा भारतात आल्यावर तिने भेट घेतलेला शाहरुख हा पहिला बॉलिवूड स्टार होता. गेल्यावर्षीही ती युट्यूब फॅनफेस्टसाठी मुंबईत आली होती. पण त्यावेळी शाहरुख मुंबईत नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती.