अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट एकाच चित्रपटात काम करणार ही माहिती मिळताच काही महिन्यांपूर्वी अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. किंग खान आणि आलिया भट्ट एकाच चित्रपटात काम करणार हीच बाब अनेकांना पचत नव्हती. पण या चित्रपटाची एक-एक झलक जसजशी सर्वांसमोर येत गेली त्याचप्रमाणे ‘डिअर जिंदगी’बद्दलचे चित्र अनेकांसमोर उघड झाले आहे. त्यामुळे आता या आगामी चित्रपटातून किंग खान आणि आलियाची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहेत. प्रेम, नाती, ब्रेकअप आणि त्यातून घडत जाणारं आयुष्य यांचे सुरेख चित्रण या चित्रपटामध्ये केले गेले आहे.

वाचा: ‘डिअर जिंदगी’ का पाहावा याची पाच कारणे

त्यामुळे जर तुम्ही असे समजत असाल की, शाहरुख आणि आलियाची जोडी या चित्रपटातील मुख्य आकर्षण असेल आणि याच कारणामुळे चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांची गर्दी होईल तर तसे होणे कठीण दिसत आहे. ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट शाहरुख खानच्या गेल्या पाच वर्षांतील त्याचा सर्वात कमी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा एक चित्रपट आहे. मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय आणि त्याचे दूरगामी परिणाम या चित्रपटावरही झालेले पाहायला मिळत आहेत.
शाहरुख खानचा हा बहुचर्चित चित्रपट संपूर्ण भारतातील जवळपास फक्त ११०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सहसा किंग खानचे कोणतेही चित्रपट ३५०० ते ५००० चित्रपटगृहांतून प्रदर्शित होतात. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांचा निर्णय आणि नोटाबंदीचा निर्णय या चित्रपटाच्या कमाईवर काय फरक पाडणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

दरम्यान, बॉलिवूडचा किंग शाहरुख सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘डिअर जिंदगी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. उद्या हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. गौरी शिंदेच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाकडून अनेकांना चांगल्याच अपेक्षा आहेत. चित्रपटाच्या नेहमीच्या धाटणीपेक्षा या चित्रपटाची संहिता वेगळी आहे. या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, करण जोहर आणि गौरी शिंदे यांनी रेड चिलीज्, धर्मा प्रोडक्शन आणि होप प्रोडक्शन या बॅनर अंतर्गत केले आहे.