झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका बरीच लोकप्रिय होती. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. मालिकेतील मानव-अर्चना ची जोडी हिट ठरली होती. याच मालिकेतील मानवच्या भूमिकेने सुशांत सिंग राजपूतला घराघरात पोहोचवलं होतं. सुशांतनंतर हितेन तेजवानी या अभिनेत्याने मानवची भूमिका साकारली होती. ‘पवित्र रिश्ता २.०’ सीरिजचा ट्रेलरही नुकताच रिलीज झाला आहे. अभिनेता शाहीर शेख यात मानवची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान शाहीर शेखने मानवची भूमिका साकारण्यासाठी स्वत:ला मानसिकदृष्ट्या कसं तयार केलं, याचा अनुभव सांगितला आहे.

मानवची भूमिका साकारण्यासाठी कशी तयारी केली याबद्दल सांगताना शाहीर म्हणाला, “आजपर्यंत मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. परंतु मानव हे पात्र खूपच वेगळं आहे. आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी एवढं निर्मळ आणि खरेपणा असलेलं पात्र माझ्या वाट्याला आलं नव्हतं. मानवसारख्या भूमिका असलेली पात्र तुम्हाला एक चांगला माणूस होण्यासाठी प्रेरित करतात. एवढचं नाही तर आजच्या जगातही मानव सारख्या चांगल्या व्यक्ती आहेत, यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात.”

मानवची भूमिका साकारण्यासाठी मला मानसिकदृष्ट्या स्वत:ला तयार करावं लागलं, असं देखील शाहीर सांगतो. “मानवच्या भूमिकेत उतरण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो. मानव आणि हे पात्र बनवण्यामागे असलेला दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मानव साकारताना अनेक गोष्टींचा मी विचार करायचो.”, असं शाहीर सांगतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका सुरू झाली होती. निर्माती एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्मस कडून या मालिकेची निर्मिती करण्यात आली होती. ‘पवित्र रिश्ता २.०’ सीरिज बद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ‘पवित्र रिश्ता २.०’ मध्ये शाहीर शेख मानवच्या तर अंकिता लोखंडे अर्चनाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहीर शेखला तुम्ही ‘महाभारत’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकांमधून पाहिलं असेल. ‘नव्या’ या मालिकेमधली अनंत बाजपेयी ही त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती.