लहानपणापासून आपण ज्या कलाकाराचे ‘फॅन’ असतो त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सगळ्या भावनिक गोष्टी त्या सुपरस्टारला कधी तरी थेट भेटून सांगायची संधी किती जणांना मिळते? ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून कलाकारांची फिरकी घेत प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या डॉ. नीलेश साबळेच्या बाबतीत त्याच्या मनातली ही गोष्ट अशी अनपेक्षितरीत्या पूर्ण करण्याची संधी मिळाली. ज्या सुपरस्टार शाहरुख खानला लहानपणापासून आदर्श मानून वाटचाल केली त्याच्याकडे मनात किती वर्षे दडलेला तो कप्पा नीलेशने मोकळा केला. शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी का होईना ‘चला हवा येऊ द्या’च्या व्यासपीठावर कुठे तरी किंग खान आणि त्याच्या ‘फॅन’ची अशीही कथा रंगली होती.

खरे तर, ‘चला हवा येऊ द्या’ या मराठमोळ्या शोमध्ये ‘नीरजा’ चित्रपटासाठी बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने हजेरी लावली, पाठोपाठ ‘रॉकी हँडसम’साठी जॉन अब्राहमशी गप्पा रंगल्या. तेव्हाच इंडस्ट्रीतील लोकांबरोबर सर्वसामान्य प्रेक्षकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. मात्र खुद्द शाहरुख खानची उपस्थिती ही या शोच्या वाढत्या लोकप्रियतेचीही ‘हॅट्ट्रिक’ ठरली. सोनम आणि जॉन यांच्या चित्रपटांमागे कुठे तरी मराठी कनेक्शन होते. शाहरुख खानच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. तर या शोची लोकप्रियता लक्षात घेऊन हा सुपरस्टार स्वत:च शोची विचारणा करत या मंचावर दाखल झाला, हे समाधान फार वेगळे असल्याचे या शोचा कर्ताधर्ता असलेल्या नीलेशने स्पष्ट केले. एरवी शाहरुख खान त्याच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी हिंदीतील जवळपास प्रत्येक रिअ‍ॅलिटी शो आणि मालिकांचे उंबरठे झिजवतो. मात्र ‘फॅन’ला मुंबईसह महाराष्ट्रात यश मिळवायचे असेल तर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला शाहरुखला चित्रपटाची निर्माती कंपनी यशराज प्रॉडक्शनकडून देण्यात आला होता. शोच्या निमित्ताने त्याच्याशी बोलत असताना शाहरुखने स्वत:हून या गोष्टींची कबुली दिली, असे नीलेशने सांगितले. आपल्याबरोबर काम करीत असलेल्या सहकाऱ्यांकडूनही या शोबद्दल कित्येकदा ऐकले होते. तुम्ही कधी तरी या शोमध्ये जायलाच हवे, असा आग्रहही याआधी आपल्याला करण्यात आला होता. प्रत्यक्षात या शोच्या सेटवर आल्यानंतर त्या सगळ्यांचे म्हणणे किती रास्त होते, याची जाणीव झाल्याचेही शाहरुखने सांगितल्याने नीलेश आणि त्याची पूर्ण टीम सुखावली आहे. मात्र शोच्या पलीकडेही शाहरुखचा फॅन म्हणून नीलेशचे एक मोठे स्वप्न या खास १७५ व्या भागामुळे पूर्ण झाल्याने हा भाग अविस्मरणीय ठरला असल्याचे नीलेशने सांगितले.

शाहरुख शोमध्ये येणार हे निश्चित झाल्यानंतर त्याच्यासाठी खास काय करता येईल, याविषयी विचार सुरू झाला होता. तेव्हा वाहिनीकडूनच शाहरुखच्या जीवनप्रवासाची कथा वेगळ्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचवायची ही कल्पना सुचवण्यात आली होती. शाहरुखवर आत्तापर्यंत ‘बीबीसी’, ‘डिस्कव्हरी’सारख्या वाहिन्यांनी कार्यक्रम केले आहेत. त्यामुळे त्याच्या मनाला भिडेल असे काही तरी हवे होते. मग आम्ही त्याच्याच गाण्यांचा वापर करून दिल्लीतून बाहेर पडलेला एक सर्वसामान्य तरुण, पत्नी म्हणून गौरीचा त्याच्या आयुष्यात झालेला नाटय़मय प्रवेश आणि त्यानंतर मुंबईत येऊन सुपरस्टार पदापर्यंत झालेला शाहरुखचा प्रवास एका बॅले अ‍ॅक्टच्या माध्यमातून त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, असे नीलेशने सांगितले. नीलेश आणि श्रेया बुगडे या दोघांनी सादर केलेला हा अ‍ॅक्ट खरोखरच शाहरुखला भावुक करून गेला. ‘रोजच्या धकाधकीत या सगळ्या संघर्षांचा, गोष्टींचा मला विसर पडला होता. त्याची आठवण तुम्ही आज करून दिलीत’, असे शाहरुखने सांगितले तेव्हा खूप आनंद झाल्याचे नीलेश सांगतो. त्याचाच प्रवास पुन्हा उलगडून दाखवताना तो त्याला लक्षात राहावा, यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम के ला होता आणि त्याचे सार्थक झाले, अशी भावना नीलेशने व्यक्त केली.

एका वेगळ्या संकल्पनेवरचा हा शो फार तर तीस-पस्तीस भागांपुरता मर्यादित असेल, असा विचार सुरुवातीला केला होता. मात्र त्यानंतर पन्नास, शंभर, दीडशे असे एकामागोमाग एक भाग करीत त्या दिवशी आम्ही शाहरुखबरोबर १७५ वा भाग पूर्ण केला, असे सांगणाऱ्या नीलेशने या शोची लोकप्रियता इतकी वाढेल अशी कल्पनाही केली नव्हती असे स्पष्ट केले. मात्र आता आपल्यावरचे दडपण, जबाबदारीची भावना वाढत चालली असल्याचेही तो सांगतो. या शोचा दर्जा, त्यातून मांडले जाणारे स्किट्स, विनोद हे कायम तितकेच दर्जेदार असावेत, अशी प्रेक्षकांची अपेक्षा वाढत चालली आहे. आणि लेखक, दिग्दर्शक, सूत्रसंचालक या तिन्ही भूमिका पार पाडत असताना दिवसेंदिवस शो अधिकाधिक चांगला करण्याचे दडपणही वाढत असल्याची कबुली नीलेशने दिली. मात्र एक कलाकार म्हणून या तिन्ही आघाडय़ांवर काम करण्याची आणि प्रेक्षकपसंती मिळवून देण्याची किमया साधलेला हा शो म्हणूनच आपल्यासाठी फार जिव्हाळ्याचा असल्याचेही त्याने सांगितले. या शोची आपली टीम खूपच सुंदर आहे आणि सगळे दिवस-रात्र विसरून जीवतोड मेहनत करतात, त्यामुळेच शोची लोकप्रियता टिकून राहिली असल्याचेही तो म्हणतो. शाहरुख आणि त्याचा जबरा फॅनअसलेल्या नीलेश साबळेची छोटीशी वेगळी कथा, शिवाय भाऊ कदम-भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे यांनी शाहरुखबरोबर केलेली धमाल सोमवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘आम्ही दोघे जुळे भाऊ ’

शाहरुख आणि माझ्यात एक धागा आहे जोडणारा, असे नेहमी वाटायचे. त्याच्या आणि माझ्या काहीएक गोष्टी सारख्या आहेत आणि त्या तशा असल्यामुळे कायम मी त्याच्याबरोबर जोडलेलो होतो. कधी तरी या गोष्टी त्याला सांगायच्या असे ठरवले होते. तशी संधी या भागात मला मिळाली आणि मी त्याला त्याची आणि माझी रास, आमच्या उजव्या हातावर असलेला तीळ, त्याच्या आणि माझ्या पत्नीचे नावही योगायोगाने गौरीच आहे, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. हे ऐकल्यानंतर शाहरुखने ‘आपण दोघेही जुळे भाऊ आहोत’, असे मिश्कीलपणे सांगत त्याने संपूर्ण शोभर खेळीमेळीत या गोष्टीची आठवण कायम ठेवली. मराठी शोमध्ये येणार हे ठरवल्यानंतर त्याच्या आयुष्यात त्याने अनुभवलेले मराठी माणसांचे किस्सेही या वेळी आवर्जून सांगितले. मराठी शोची लोकप्रियता ऐकून स्वत:हून आपल्या शोमध्ये येणाऱ्या शाहरुखचे कौतुक वाटते, असेही नीलेशने सांगितले.