नव्वदच्या दशकात आलेल्या कार्टुन कॅरेक्टरपैकी ‘सिम्बा’ या कार्टुनने काही वेगळीच जादू केली होती. साधरण तेवीस एक वर्षांपूर्वी याच ‘सिम्बा’ कार्टुन कॅरेक्टरवर आधारित ‘द लायन किंग’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने बच्चे कंपनीवर एक वेगळी छाप उमटवली होती. आता हाच चित्रपट एका नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘द लायन किंग’च्या हिंदी चित्रपटातील भूमिकांना काही नामवंत कलाकारांनी आवाज दिला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटद्वारे ‘द लायन किंग’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याचे सांगितले आहे. ‘शाहरुखानच्या आवाजातील द लायन किंगचा ट्रेलर प्रदर्शित. हा चित्रपट १९ जुलै २०१९ रोजी हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणाऱ्या सिम्बाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सध्या ‘द लायन किंग’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या चित्रपटातून पदार्पण करत आहे. ‘सिम्बा’ या मुख्य भूमिकेला आर्यन आवाज देणार आहे. तर मुफसा या भूमिकेसाठी शाहरुखला निवडण्यात आलं आहे. शाहरुख व आर्यन खानसोबतच मराठी अभिनेता श्रेयस तळपदे ‘टीमॉन’ या भूमिकेला आवाज देणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेते आसरानी यांचा आवाज ‘झाझू’च्या भूमिकेला असेल. संजय मिश्रा ‘पुम्बा’साठी तर आशिष विद्यार्थी ‘स्कार’साठी आवाज देणार आहेत.

९० च्या दशकात गाजलेला हा जंगलाचा राजा सिम्बा आजच्या बच्चेकंपनीच्या विस्मृतीत गेला आहे. म्हणूनच डिझ्नेने ९० च्या दशकातल्या या लोकप्रिय ‘लायन किंग’ला नवसंजीवनी देण्याचे ठरवले आहे. १९ जुलैला ‘ द लायन किंग’चा रिमेक प्रदर्शित होणार आहे. १९९४ मध्ये आलेल्या मूळ ‘द लायन किंग’चा हा रिमेक असणार आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर हा चित्रपट अधिक प्रभावीपणे पडद्यावर दाखवण्याचा यावेळी डिझ्नेचा प्रयत्न असणार आहे