‘थ्री बिलबोर्ड..’, ‘डंकर्क’, ‘फॅण्टम थ्रेड’ सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत

मानव आणि समुद्रीजिवाच्या भावबंधाची गोष्ट सांगणाऱ्या ‘शेप ऑफ वॉटर’ या गिआर्मो डेल टोरो या दिग्दर्शकाच्या चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वाधिक १३ नामांकने मिळाली. तरुणाईचा लाडका दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा युद्धपट ‘डंकर्क’ आणि गेल्या महिन्याभरामध्ये महत्त्वाच्या सर्व पुरस्कारांवर मोहर उमटविणारा  सूडपट ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग, मिझूरी’ यांना नामांकनामध्ये प्रचंड मागे टाकून ‘शेप ऑफ वॉटर’ने चर्चेची नवी हवा तयार केली. मात्र गेल्या वर्षी ‘ला ला लॅण्ड’ने चौदा नामांकने मिळवून केलेल्या विक्रमाशी या चित्रपटाला बरोबरी करता आली नाही.

ऑस्कर पुरस्कारासाठीच्या दावेदारांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली.  त्यात ‘थ्री बिलबोर्ड..’, ‘डंकर्क’, ‘फॅण्टम थ्रेड’, ‘डार्केस्ट अवर’ या चित्रपटांच्या वाटेला अनुक्रमे सहा नामांकने आली आहेत. यंदा सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी नऊ चित्रपटांमध्ये चुरस असेल. त्यात वरील चित्रपटांसमवेत ‘द पोस्ट’, ‘गेट आऊट’, ‘कॉल मी बाय युवर नेम’ , ‘लेडी बर्ड’ यांचा समावेश आहे.

मेरिल स्ट्रीप यांची एकविसावी चुणूक

गेल्या कित्येक वर्षांत ऑस्करच्या सर्वोत्तम अभिनेत्री गटातील यादी मेरिल स्ट्रीप या नावाशिवाय पूर्ण होत नाही. स्टीवन स्पीलबर्ग यांच्या ‘द पोस्ट’ चित्रपटामध्ये कॅथरिन ग्रॅहम यांची भूमिका समरसतेने जगणाऱ्या स्ट्रीप यांनी यादीतल्या सहभागाचा शिरस्ता पाळला आहे. स्ट्रीप यांचे हे एकविसावे मानांकन आहे.