करोनाच्या महासाथीविरोधात देशवासियांना पुन्हा एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरचित्रवाणी संदेशाद्वारे केले. रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी लोकांनी आपापल्या घरातील दिवे बंद करावेत व मेणबत्ती, मोबाइलचा दिवा व बॅटरीचा दिवा लावून दिव्यांचा झगमगाट करावा. हा प्रकाश म्हणजे करोनामुळे पसरलेल्या अंधकाराविरोधातील लढाई असल्याचे मोदी म्हणाले. मात्र त्यांनी केलेल्या या आवाहनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली. आधी टाळ्या वाजवायला सांगितल्या आणि आता दिवे लावायला सांगत आहेत, यामुळे करोना जाईल का, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली. मात्र मराठी अभिनेता शशांक केतकरने मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवत, सतत दोष काढू नका, अशी विनंती लोकांना केली आहे.

‘मंडळी नका सतत नावं ठेवू. नका सतत दोष काढू. दिवाळीत पणती लावतो तसंच फक्त ९ मिनिटं पणती, दिवा, मोबाईचा फ्लॅश लावायचा आहे. तुमच्या घरातच राहून, कँडल मार्च काढू नका’, अशी विनंती शशांकने केली आहे.

मोदींच्या या उपक्रमावर विरोधी पक्षांनी तीव्र टीका केली. प्रतिकात्मकता दाखवण्यापेक्षा वास्तव समस्येला सामोरे जा, असा सल्ला विरोधकांनी दिला आहे. स्त्री-पुरुष, उद्योजक-रोजंदार मजूर तुमच्याकडून आर्थिक घोषणांची अपेक्षा करत होता. गडगडलेल्या अर्थकारणाला टेकू देण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले जातील याकडे डोळे लावून होता, अशी टीका माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनी केली. मोदींनी पुन्हा देश ‘राम भरोसे’ सोडून दिल्याची टीका काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केली. नऊ आकडय़ाचे औचित्य साधण्याचा हा प्रयत्न असल्याची टिप्पणी त्यांनी केली. दिवे प्रज्ज्वलित करण्यापेक्षा देशाला आठ ते दहा टक्के विकासदराची गरज आहे. खऱ्या प्रश्नाकडे वळा, बनावट वृत्ताचे कारण देत प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणण्याचे थांबवा, अशी तीव्र प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी व्यक्त केली.