कधीकधी एखाद्या कार्यक्रमाविषयी किंवा मग चर्चेत असणाऱ्या एखाद्या विषयावर मनोगत व्यक्त करताना काही प्रसंगी कलाकारही चुकीचे वक्तव्य करुन जातात आणि मग एका नव्या चर्चेला तोंड फुटते. असेच काहीसे अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत घडले आहे. नुकतेच ‘इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेण्डरी एज्युकेशन (ICSE)’द्वारे प्रसिद्ध काल्पनिक कादंबऱ्यांना अभ्यासक्रमाचा एक भाग करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. समकालीन साहित्य आणि काही विनोदी, काल्पनिक मासिकं जसे ‘हॅरी पॉटर सिरीज’, ‘टिनटिन अॅण्ड एस्टेरिज’ अशा पुस्तकांचा यात समावेश आहे. इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठीच्या अभ्यासक्रमात या पुस्तकांचा समावेश करण्यात आला. या निर्णामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वाचा: लंडनमधील उपहारगृहात शिल्पा शेट्टीच्या नावाने ‘एसएसके स्पेशल’ डिश!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मात्र या बाबतीच काहीसा गैरसमज झाल्याचे दिसत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिल्पाने म्हटले आहे की, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स आणि हॅरी पॉटर यांसारखी पुस्तके वाचल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीत वाढ होते’. यासोबतच एक सल्ला देत शिल्पा म्हणाली, ‘यामध्ये जॉर्ज ऑरवेल यांची ‘अॅनिमल फॉर्म’चीसुद्धा यासाठी मदत होऊ शकते. कारण यामुळे मुलांना प्राणिमात्रांवर प्रेम कसे करता येईल आणि त्यांची काळजी कशी घेतली जाईल याबाबतची माहितीही मिळेल’. शिल्पा तिच्या या वक्तव्यामुळे नेटिझन्सच्या चांगलीच कचाट्यात सापडली आहे. याचे कारण असे की, शिल्पाने सुचविलेले हे पुस्तक ‘रशियन साम्यवादा’वर आधारित आहे.

शिल्पाच्या या विधानामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच शाळा घेतली जात आहे. #ShilpaShettyReviews या हॅशटॅगअंतर्गत शिल्पाची चुक लक्षात आणत अनेकांनी तिची खिल्ली उडविली. ट्विटरवरील एका यूजरने लिहिले की, ‘द हंगर गेम करवा चौथची चांगली सिरीज आहे’, तर एका यूजरने लिहिलं की, ‘थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी नातेवाईकांसोबत चांगले कसे वागायचे यावर भाष्य करते’. अशा अनेक ट्विटर यूजर्सनी ट्विट करत शिल्पाला निशाणा केले. शिल्पा शेट्टीच्या या सामान्य ज्ञानावरुन #ShilpaShettyReviews चांगलाच ट्रेंडमध्ये आला होता.