कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांची वैद्यकीय तपासणी व्हावी आणि ते जेथे चित्रीकरण करतात त्या ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्य तापसणी मोहीम राबविण्याचा उपक्रम शिवसेना चित्रपट सेनेने हाती घेतला आहे. उपक्रमाची सुरुवात सोमवारी मढ आयलंड येथे ‘जावई विकत घेणे आहे’च्या सेटवर झाली. यापुढे शिवसेना चित्रपट सेनेकडून मुंबईतील चित्रीकरणस्थळे आणि स्टुडिओ येथे नियमितपणे ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
सध्या मुंबईत विविध साथीचे आजार सुरू आहेत. अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे रोगराई व साथीचे आजार वाढत आहेत. विविध चित्रीकरणस्थळे आणि स्टुडिओ येथे काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे आरोग्य चांगले राहावे, ते जेथे काम करतात तेथे स्वच्छता असावी, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या आरोग्याची तपासणी चित्रीकरणस्थळी केली जावी, या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून शिवसेना चित्रपट सेनेने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले. यापुढे चित्रीकरण होत असलेली विविध ठिकाणे आणि स्टुडिओ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे ते म्हणाले. सोमवारी मढ बेटावर ‘जावई विकत घेणे आहे’या मालिकेच्या चित्रीकरणस्थळी जंतूनाशक तसेच कीटकनाशकांची फवारणी, साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डासनाशक गोळ्यांचा वापर करण्यात आला. तसेच बृहन्मुंबई महापालिकेच्या डॉक्टरच्या उपस्थितीत मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेते सुबोध भावे, महापालिका अधिकारी, डॉक्टर, चित्रपट सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.