१९७५ साली आलेला रमेश सिप्पी यांचा ‘शोले’ हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातली एक दंतकथा बनून राहिला आहे. हा चित्रपट, त्याचे आजवरचे यश, त्याच्या निर्मितीबद्दलचे किस्से, त्यातील कलाकार अशा अनेक गोष्टी आजही चवीने चर्चिल्या जातात. आणि आजच्या तरुण पिढीलाही ‘शोले’चे तेवढेच आकर्षण आहे. त्यामुळे ज्यांनी त्या काळी मोठय़ा पडद्यावर ‘शोले’ची गंमत अनुभवली नाही त्यांना ही संधी ‘शोले’ थ्रीडीच्या निमित्ताने मिळणार आहे. तर जी पिढी ‘शोले’च्या जादूई अनुभवाची साक्षीदार आहे त्यांना नवीन तंत्रात ही जादू कायम राहील की काही वेगळे सापडेल अशी उत्सुकता आहे. पण, ‘शोले’बद्दल कितीही बोललं गेलं, लिहिलं गेलं असलं तरी त्याचे किस्से अजून संपलेले नाहीत. ‘शोले’ थ्रीडी ३ जानेवारीला प्रदर्शित होतो आहे त्या पाश्र्वभूमीवर शोलेच्या निर्मितीविषयी अशाच काही न ऐकलेल्या गोष्टी..
‘शोले’ हा शब्द कित्येक पिढय़ांच्या मनावर असा काही कोरला गेला आहे की या चित्रपटाचे दुसरे काही नाव असू शकते, अशी कल्पनाही आपल्या मनात येणे अशक्य आहे. पण, खरोखरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्याचे नाव पहिल्यांदा ‘एक दो तीन..’ आणि दुसऱ्यांदा ‘मेजरसाब’ असे ठेवण्यात आले होते. पण, चित्रपट मध्यावर येईपर्यंत त्याचे नामकरण ‘शोले’ असे करण्यात आले होते. त्यामुळे आजवर कितीतरी ‘मेजरसाब’ आणि ‘एक दोन तीन..’ असे चित्रपट येऊन गेले मात्र ‘शोले’ पुन्हा झाला नाही..
१९७५ साली ‘शोले’ची निर्मिती झाली तेव्हा बॉलिवूडमध्ये नसेल पण हॉलिवूडमध्ये चित्रपट तंत्रज्ञानात फारच प्रगती झाली होती. त्यामुळे तेव्हा या चित्रपटाचे चित्रीकरण परफेक्ट होण्यासाठी परदेशी तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले होते. खुद्द हॉलिवूड अभिनेता सीन कॉनेरीच्या बाँडपटावर ज्या तंत्रज्ञांनी काम केले होते त्यांनीच ‘शोले’चेही काम केले आहे. हेच नव्हे तर आज इतक्या वर्षांनी ‘शोले’ थ्रीडीची निर्मिती होत असली तरी त्याही वेळी हा चित्रपट थ्रीडी करण्याचा पर्याय आपल्यासमोर खुला होता, असे रमेश सिप्पी यांनी म्हटले आहे. थ्रीडी चित्रपटाच्या निर्मितीबद्दल आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही म्हणून फुगलेल्या रमेश सिप्पींनी तेव्हाही आपल्यासमोर ७५ एमएम किंवा थ्रीडी असे दोन पर्याय देण्यात आले होते, असे म्हटले आहे. पण, आपण ७५ एमएमचा पर्याय निवडला. मला ‘शोले’ थ्रीडीत बनवायचा असता तर तेव्हाच बनवला नसता का?, असा उलट सवाल करत थ्रीडी ‘शोले’च्या निर्मात्यांना न्यायालयात खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
‘शोले’चा भव्य सेट आणि एवढे सारे लहानमोठे कलाकार.. त्यातल्या प्रत्येकाचीच चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. पण, एवढा मोठा कलाकारांचा ताफा सांभाळला कसा? यावर त्या काळी निर्मात्यांनी चित्रपट करताना फार व्यावसायिक पद्धतीने तो केला होता, असे सांगितले जाते. म्हणजे सेटवर गेल्यानंतर संवाद हातात पडण्याचा एक काळ होता. इथे मात्र, प्रत्येक कलाकाराला आदल्या रात्रीच कामाच्या नियोजनाचा तक्ता दिला जायचा. आणि त्यातल्या प्रत्येक सूचना पाळणे कलाकारांवर बंधनकारक होते. पण एवढे सगळे असूनही कोणत्याच प्रकारचे गैरसमज, राग अशा गोष्टी निदान ‘शोले’च्या सेटवर तरी घडल्या नाहीत.
गंमत म्हणजे कितने आदमी थे? असं हातातला पट्टा दगडावर आपटत भीती निर्माण करणाऱ्या गब्बरसिंगसाठी खऱ्याखुऱ्या डाकू गब्बरचा आधार घेण्यात आला होता. गब्बरसाठी ‘मेहबूबा ओ मेहबूबा’वर ताल धरणारी हेलन आणि ते गाणे ज्या वाळवंटात चित्रित झाले तेही इथल्याच आर. के. स्टुडिओतले..अशा अनेक ‘शोले’च्या गोष्टी इतस्तत: विखुरलेल्या आहेत. या गोष्टी समोर आल्या की पुन्हा कसा निर्माण झाला असेल हा चित्रपट? हीच उत्सुकता पुन्हा पुन्हा चाळवली जाते.