आपल्या आवाजानं गेली कित्येक वर्षे श्रोत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या गायक सोनूवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून घेण्याची वेळ आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान सोनूनं भारतीय गायकांसोबत केला जाणाऱ्या दुजाभावाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘आजच्या काळात गायकांना गाण्यासाठी म्यूझिक कंपनीला पैसे द्यावे लागतात. शोसाठी म्यूझिक कंपनी भारतीय गायकांकडून पैसे मागतात. पैसे दिले की तुम्हाला प्रसिद्धी देतात. मात्र पैसे देण्याचं नाकारलं की मात्र तुम्हाला ते गाऊ देत नाही ना काम देत. आताच्या घडीला भारतीय गायकांची ही परिस्थीती आहे. पण आपल्या देशात पाकिस्तानी गायकांना मात्र चांगली वागणूक दिली जाते, शोसाठी त्यांच्याकडून  कंपनी पैसे घेत नाही. त्यांना इथे कामही मिळतं. मग हा दुजाभाव केवळ भारतीय कलाकारांसोबत का? त्यापेक्षा पाकिस्तानी गायक असलेलं काय वाईट आहे?’ असं म्हणत सोनूनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सोनूनं आताच्या घडीला गायकाला येणाऱ्या वाईट अनुभवांबद्दल नाराजी व्यक्त केली.  म्युझिक कंपनीच्या अशा वर्तणुकीमुळे गेल्या कित्येक वर्षात नवीन आणि चांगली गाणी आलेली नाही. याचमुळे प्रमाणाच्या बाहेर रिमिक्स गाणी चित्रपटात येत आहेत असंही सोनू म्हणाला.