पाकिस्तानी कलाकारांची भारतीय चित्रपट सृष्टीतून घरवापसी होत असताना, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शाम बेनेगल फवाद खानसोबत भारत-पाक संबंधावर आधारित चित्रपट काढण्याची तयारी करत आहेत. जम्मू काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच मनसेने दिग्दर्शक करण जोहर आणि महेश भट्ट यांना पाकिस्तानी कलाकारांसोबत चित्रपट केरु नये, असा इशारा वजा धमकी दिली होती. पाकिस्तानी कलाकारांना घेऊन काम करण्यामुळे देशात वादंग उठत असताना बेनेगल कलेवर अन्याय होऊ, नये या भूमिकेतून फवाद खानला आपल्या चित्रपटामध्ये स्थान देणार असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केले आहे.
‘ये रास्ते है प्यार के’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात फवाद खान एका संगीतकाराची भूमिका साकारता दिसणार असल्याचे देखील समजते. ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटातून फवाद खानला वगळण्याची मागणी जोर धरत असताना बेनेगल यांची संकल्प पूर्ण होणे कठिण आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेमूळे बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधाचा मुद्दा चर्चेला येण्याचे संकेत आहेत. बॉलीवूड तसेच बॉलीवूड चाहत्यांकडून या निर्णयामूळे काय प्रतिक्रिया उमटतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. उरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केलेल्या पाकिस्तानी कलाकारांमध्ये फवादचे नाव आघाडीवर होते. फवाद खानसह, महिरा खान, आतिफ असलम, अली झफर या पाकिस्तानी कलाकारांना मनसेने धमकी दिली होती.
करण जोहरवर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील फवादच्या भूमिका बदलण्याची देखील वेळ आली आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’च्या नवीन ट्रेलरचा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता फवाद खानऐवजी या ट्रेलरमध्ये एक नवा चेहरा दिसत आहे.