सिद्धार्थ चांदेकर – response.lokprabha@expressindia.com
आठवणींचा अल्बम सतत वेगवेगळी छायाचित्रं आपल्यासमोर ठेवत असतो. जितकी संवेदनशीलता जास्त, तितका तो आल्बम अधिक ठसठशीत याचा प्रत्यय या लेखातून येतो.

आपल्या आठवणी फोटोफ्रेम्ससारख्या असतात. त्यांना अडकवायलासुद्धा भिंत लागते. मग कधी ती भिंत घराची असते, लोकांची, जेवणाची किंवा मग सणांची. माझ्यासाठी या सगळ्यांची मिळून एक भिंत आहे. ज्यावर मी माझ्या आठवणी अडकवल्या आहेत. त्यावर कधीच धूळ साठत नाही. जणू आत्ताच पुसल्या आहेत, अशा त्या कायम स्वच्छ असतात. लखलखीत असतात. कधी कधी मी त्यांच्याकडे शांतपणे बघत उभा असतो. हातांची घडी घालून.

आमच्या घराच्या पत्र्यावर चढणं खूप अवघड असायचं. बाल्कनीमध्ये एक कॉट टाकलेली आणि ती मावेल तेवढीच जागा. त्यामुळे ‘मी कॉटवर अभ्यासाला बसतोय’ किंवा ‘कॉटवर बसून जेवतो आज’, असं म्हटलं की कळायचं नक्की कुठे ते. पण ती कॉट टाकल्यामुळे एक बरं झालं होतं, पत्र्यावर चढण्यासाठी आईचे अ‍ॅल्युमिनिअमचे डबे किंवा तो डुगडुगणारे स्टूल वापरावे लागत नव्हते. बाल्कनीच्या कठडय़ाचा वापर करणं अशक्यच होतं, कारण तो असा बाहेरच्या बाजूनं झुकलेला. आता ५५ र्वष जुनी इमारत होती, तिथे राहणाऱ्यांचं स्वाभिमान सोडला तर बाकी सगळंच पोकळ आणि वाकलेलं होतं. खालून पहिलं तर तो तिसऱ्या मजल्याला वरचा कठडा कधीही आपल्या अंगावर पडेल असा वाटायचं.

आमची नानी सांगायची ‘ही बांधली तेव्हा अख्ख्या सदाशिव पेठेतली सगळ्यात उंच इमारत होती, इथून अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरची मिरवणूक दिसायची. अगदी तुळशीबागेपासून ते अलका टॉकीजपर्यंत.’ माझा खरं तर यावर कधीच विश्वास बसला नाही. ही इमारत कशी असेल सगळ्यात उंच? आजूबाजूच्या इमारतींची सावलीच आमच्यावर अशी पडायची की आमच्याकडे संध्याकाळ लवकर येते का काय असं वाटायचं. त्यातल्या काही इमारतींच्या खिडक्या मोजायचा खेळ मी आणि ताई खेळायचो, प्रत्येक वेळी वेगळा आकडा यायचा. नानी काहीही बोलते. तिला वाटतं आज जुनं काही तरी सांगतेय, तर त्याचा विश्वास बसेल लगेच. उगाच काहीतरी.

आज मी जरा जास्त घाईघाईत घराचे जिने चढत वर आलो. हातात रिकामी पिशवी होती. त्यात दोन-तीन उदबत्त्या, काडेपेटी आणि मेणाच्या पणत्या उरलेल्या. फटाके संपले होते सगळे. होतेच किती म्हणा. ती टाकली पटकन कॉटखाली. अंगावरचा झब्बा काढला. टीशर्ट चढवला. एका बोलमध्ये थोडा चिवडा आणि तीन चकल्या घेतल्या. रात्रीचे साडेआठ वाजले होते. आजूबाजूच्या फटाक्यांचा आवाज इतका होता की कानगोष्टीसुद्धा नीट खेळता आल्या नसत्या. मला पत्र्यावर लगेचच जायला पाहिजे होतं. कधीही सुरू होईल आता. कॉटवर चढलो. एक सतरंजी वर टाकली. चिवडय़ाची वाटीसुद्धा सरकवली हात वर करून. कठडय़ाला लगोलग एक जाळी होती जी शेजारच्या आणि आमच्या गच्चीच्यामध्ये दुव्याच काम करायची. त्या जाळीवर पाय ठेवला आणि त्याचा आधार घेऊन पत्र्यावर हात टाकला. हाताला काचेचं काही तरी लागलं. लगेच कळलं मला काय होतं ते.

आजचा दिवस फारच सुंदर गेला. आईने मी नरकात जाऊ नये म्हणून पहाटे पाचलाच उठवलेलं. मला पांघरुणातून बाहेर काढण्यातच अर्धा तास गेला तिचा. काय करणार? थंडीच इतकी कडाक्याची होती की त्या रगमधून बाहेर पडावसंच वाटायचं नाही. खूप अळम्टळम् केल्यानंतर ‘मी आता पाणी उडवेन अंगावर’, असं आई ओरडली तेव्हा झुर्रकन पांघरुणातून बाहेर आलो. दात घासून आलो तेच आईने चहा प्यायला बसवलं. त्या गार शहाबादी फारशीवर बसलो की असं वाटायचं की आपण जणू बर्फाच्या लादीवरच बसलोय. तेवढय़ात ट्रेनच्या हॉर्नचा आवाज आला जोरात. मला कळायचंच नाही की पुणे स्टेशनवरच्या ट्रेनचा आवाज इथपर्यंत कसा काय येतो? तिथे असलेल्यांचे तर कान फाटतच असतील.

आंघोळीची मोरी घराबाहेर समोरच्या बाजूला असायची. तिथे फक्त अंघोळ, कपडे धुणं, भांडी वगैरे चालायचं. लघू आणि मोठय़ा शंकेसाठी खालच्या मजल्यावर एक कॉमन टॉयलेट असायचं, तिथे जावं लागायचं आपापली बदली घेऊन. मोरीबाहेर दोन तेलाच्या पणत्या मी उठायच्या आधीच आईने लावून ठेवलेल्या. आधी बाबा जाऊन आले आंघोळीला. ते गेल्यावर मी आणि ताई दोन फुलबाज्या पेटवून दारापाशीच गोल गोल फिरवत बसलो. बाबा बाहेर आल्यावर आईने माझ्यासाठी पाणी काढलं. मला फार भीती वाटत होती. एवढय़ा कडाक्याच्या थंडीत पाणी काय अंगावर ओतून घ्यायचं. आईने पाटावर बसवलं. आणि आपल्या नरम हातांनी माझ्या अंगभर तेल चोळू लागली. हात आणि पाठ आईने इतक्या जोरात रगडले की ती थंडी कधीच नव्हती असं वाटायला लागलं. आई माझी तशी मेहनत खूप करायची..तरीही तिचे हात मऊ होते. कापसासारखे.

माझ्या आईला सगळं जमतं. प्रेम करणं, रागावणं, पाठीशी उभं राहणं, चुकांवर पांघरूण टाकणं. सगळं म्हणजे सगळं. तिला फक्त खोटं नाही बोलता येत. खरं सांगून टाकण्यापेक्षा गप्प राहिलेला बरं असं ओठांनी ठरवलेलं असलं तरी डोळ्यांना हे काही जमता जमत नाही. सगळं दिसत असतं त्यात. पाठीवरून हात फिरवतानाही असंच काही तरी होतं.

‘‘मस्त उटणं लावून दिलंय. मोती साबणाने नीट आंघोळ कर आणि जरा कोपर घास हाताचे.. गुडघेपण काळपट झालेत. मग नमस्कार कर देवाला आणि जा उंडारायला’’, एवढंच सांगत असताना ती आवंढा का गिळत होती माहीत नाही. प्रेम असेल का माझ्यावरचं? ते आहेच.. पण ते दाखवताना रडत नाही कधी. आज काय झालंय काय माहिती.

‘‘बाबा कुठे गेले?’’ मी आंघोळ करून आल्यानंतर विचारलं. आई पोहे करत होती.

‘‘दाणे टाकलेत.’’ ती म्हणाली.

‘‘आणि बटाटे?’’ मी निर्लज्जासारखं विचारलं.

‘‘आई गं! विसरले रे बाळा. उद्या परत करेन तेव्हा टाकते. तू आवर चल. झब्बा घाल आणि फार पावडर लावू नकोस.’’

‘‘बाबा कुठे गेलेत?’’ मी परत विचारलं.

‘‘माहीत नाही.’’

‘‘कधी येणारेत?’’

‘‘माहीत नाही.’’

‘‘फटाके?’’

‘‘मामाने आणून दिलेत काल. कॉटखाली ठेवलेत पिशवीत.’’

आई खूप कोरडं बोलत होती.

‘‘आई, तू रागावलीयेस माझ्यावर?’’

ती पोहे वाढत वाढत थांबली. तशीच मान खाली घालून उभी राहिली जरा वेळ.

‘‘नाही रे बाळा. तुझ्यावर का रागवेन. जरा डोकं गरगरतंय. म्हणून. ये खाऊन घे.’’

तिने ताटली पुढे सरकवली. ताटलीत पिवळेधम्मक पोहे होते. त्या पोह्य़ांकडे पाहून मी सगळं विसरलो. किती सुंदर दिसत होते ते. त्या पिवळ्या रंगाकडे पाहिल्यावर मला आजूबाजूचा सगळं धुरकट दिसत होतं. अलगद वाफ येत होती त्यातून. ती अशी आईच्या चेहऱ्यापाशी जाऊन हरवून जात होती. हिरव्या मिरच्या, दाणे आणि छोटुशी मोहरी तर मण्यांसारखी चमकत होती. काय गोड दृश्य होतं ते. तीन-चार दिवस उपाशी राहिल्यासारखं खात होतो मी. अगदी वेडय़ासारखं. मी खात असताना आई माझ्याकडे डोळे भरून पाहत होती. हसली एकदा. मग परत शांत झाली. जणू कधीच हसली नव्हती.

तो अख्खा दिवस मी बाबांना पाहिलंच नाही. पहाटे एक आकृती दिसली होती फक्त पणत्यांच्या आणि आकाशकंदिलाच्या प्रकाशात. त्या आकृतीने आंघोळीनंतर अंगावरचा टॉवेल फेकला, एक झब्बा चढवला. पहाटेच्या जाड आवाजात ‘आलोच’ असं पुटपुटून गायब झाली ती जिन्याच्या अंधारात. पुढचा अख्खा दिवस मला घरात मजाच येत नव्हती. का देव जाणे. थांबावंसंच वाटत नव्हतं. खाली फटाके फोडत असताना जेव्हा जेव्हा वर घराकडे लक्ष जायचा तेव्हा लांब एका टेकडीवर आभाळ भरून आल्यावर कशी ती एकदम अंधारी दिसत, ढगांच्या सावलीत हरवलेली; तसं दिसायचं घर. अधेमधे वर पाहिलं तर आई एकटी उभी दिसायची गच्चीत. मी दिसलो की स्माइल करायची. मला आठवतंय माझं आणि आईचं बोलणं त्या दिवसांमध्ये फक्त स्माइलनेच व्हायचं. ती माझ्याकडे बघून हसायची आणि मी तिला जीभ बाहेर काढून चिडवायचो. मग तीपण तेच करायची आणि परत हसायला लागायची मी आणि ताई दिसलो की. ते हसणं माझ्यापुरतं होतं फक्त.

फटाके पुष्कळ फोडले आज मी. आमच्या वाडय़ात शहा काकू राहायच्या, त्यांचा मुलगा लोकेश, त्याने दोन पिशव्या भरून फटाके आणले होते. तो खूप लहान असल्यामुळे तो सारखा मला ‘दादा हे फोडून देना, ते फोडून देना..’ असं म्हणत म्हणत आख्खी एक पिशवी मलाच दिली. मला काय. मी फोडले. माझ्याकडे चिमणी, लक्ष्मी आणि पाणपट्टय़ा होत्या. भुईनळे आणि चक्र संध्याकाळसाठी होते. नाग गोळ्या होत्या थोडय़ा. त्या नानीला घराबाहेर पेटवून दाखवल्या. त्या गोळीचा नाग होताना नानी अशी घाबरून हसायला लागायची. तिला बघून मला हसू यायचं. नानी आमची टिपिकल आजी होती. आजी हा शब्द उच्चारल्यावर जो चेहरा समोर येतो ना.. तसाच चेहरा. जाड िभगांचा चष्मा, खूप जास्त पांढरे केस आणि तेच पातळ अंगावर. रोज. नानी घरात नाही राहायची. बाहेर उंबऱ्याशीच तिने तिची जागा तयार केली होती. बबनबरोबरच्या एका भांडणानंतर ती तिथेच झोपायची. तिथेच जेवायची. तिथेच आजारी पडायची आणि तिथेच बरीही व्हायची. मी फटाके फोडून वर आल्यावर नानीलाही विचारलं, ‘बाबा कुठे गेलेत माहितीये का गं तुला?’ नानीने आईकडे पाहिलं आणि परत आपल्या दात नसलेल्या हिरडय़ांवरून ओठ फिरवत बसली. मला डोळ्यांनी ‘गप्प बस’ असा इशारा केला आणि तिच्या वाटीतल्या चार शंकरपाळ्या माझ्या हातात ठेवल्या. जाम राग आला मग मला तिचा. आता ‘बाबा कुठे गेलेत’ यात गुपित ठेवण्यासारखं काय आहे? सांगत का नव्हतं मला कुणीच? काही सरप्राइज आणायला तर गेले नसतील? म्हणजे असेच एकदा सकाळी गायब झाले होते आणि संध्याकाळी येताना कॉलर आयडी असलेला फोन घेऊन आले होते. आख्ख्या वाडय़ाला सांगून आलो होतो मी नाचत नाचत. बाबा टीव्ही आणायला तर गेले नसतील ना? आमच्याकडे टीव्ही नव्हता..म्हणजे पूर्वी होता, आता नव्हता. कारण काही दिवसांपूर्वी खूप लोक आले होते घरी.. साताठजण. शर्ट पॅण्ट घालून. ते आमच्या घरातलं सगळं घेऊन गेले होते. टीव्ही, फ्रिज, कॉलर आयडी फोन, कुलर..सगळं. बाबा म्हणाले सगळ्याचं सव्‍‌र्हिसिंग करायचंय. खूप दिवस लागणार होते ते सगळं नीट व्हायला. माझा मिताशीचा टीव्ही व्हिडीओ गेम आईने पटकन कपाटात ठेवला होता म्हणून तो नाही नेला. तो बिघडलाच नव्हता. तो कशाला नेतील? तेव्हापासून खूप बोर होत होतं. एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट टीव्ही आणला होता तात्पुरता.. पण त्यात मजा नाही यायची. आई म्हणायची तो टीव्ही माझ्यासारखा आहे. दोन दणके घातले की चांगला चालतो. आणि ती हे सगळ्यांना सांगायची. तिला तिचा हा विनोद बहुतेक प्रचंड आवडलेला.

दुपारी माझ्या दोन्ही मावश्या घरी आलेल्या. आईच्या लहान बहिणी. त्या आईसोबत कॉटवर बसलेल्या आणि तिघी एकत्र रडत होत्या. ताई म्हणायची त्या तिघींना सीसीडी झालाय. कम्पल्सिव्ह क्राइंग डिसऑर्डर. एकीच्या डोळ्यात पाणी आलं की बाकी दोन्ही पुढच्या सेकंदाला रडायला लागायच्या. आणि मग त्यांच्यात डोळे पुसायची स्पर्धा व्हायची. पण माझ्या खूप लाडक्या मावश्या आहेत त्या. मला खूप आवडायचं त्या घरी आल्या की. आज थोडं वेगळं वाटत होतं. आई दोघींच्यामध्ये बसून फक्त रडत होती आणि त्या दोघी तिला समजावत होत्या. तिच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवत होत्या. मी जवळ गेलो तर मावशीने मला थांबवलं.

‘ये जेवायला वाढते तुला.’

‘आई का रडतेय?’ मी विचारलं.

‘तिला बरं नाही वाटते. पोटात दुखतंय’

मी परत काही तरी विचारायला जाणार तेवढय़ात मावशीने जेवणाचं ताट वाढून समोर ठेवलं. आईने माझ्यासाठी तांबडय़ा माठाची भाजी, गाजराची चटणी आणि आमटी केली होती. मी परत हरवून गेलो. परत आजूबाजूचं विसरून गेलो. माझी आई माठाची भाजी जगात सगळ्यात उत्तम करते. मी तेव्हा पोळ्या कमी आणि भाजीच खूप खायचो. त्या माठाच्या भाजीतून थोडं लाल पाणी पोळीकडे सरकायचं. आणि पोळी खालून लाल व्हायची. आणि बरोब्बर शेवटचा घास ओल्या पोळीचा असायचा. खूप सुंदर लागायचं ते. आणि आज तर भाजी आणि चटणी इतकी अप्रतिम होती की गुंगीच आली मला. का नाही येणार. मी बाल्कनीत गेलो. आईला घट्ट मिठी मारून पप्पी दिली. तिनेही दिली. आणि आत गेलो झोपायला. पडदे सरकवले. टेबलावरचा फॅन लावला. आणि तडक पांघरुणात शिरलो. गुरफटून झोपलो. पहाटेसारखीच थंडी वाजत होती. दोन्ही हातांनी पांघरूण छातीशी धरलं आणि थोडय़ा वेळेपुरता नाहीसा झालो.

माझ्या शाळेच्या मदानावर लाकडाच्या फळकुटांनी बनवलेल्या स्टेजवर आईचं नाटक चालू होतं. त्यात ती आणि आणखी एक म्हातारे गृहस्थ होते. पहाटे पाच वाजता कडाक्याच्या थंडीत आई भरजरी साडी नेसून, खूप सारे दागिने घालून काम करत होती. खूप सुंदर दिसत होती. पुणे स्टेशनवरच्या ट्रेनचा आवाज जसा सगळीकडे पसरायचा तसा आईचा आवाज अख्ख्या ग्राऊंडभर घुमत होता. तिच्या एकटीचा आवाज. मी माझ्या बाकडय़ावर बसून, खिडकीतून डोकावून, आईला स्टेजवर काम करताना पाहत होतो. तिचे ओठ हालत नव्हते. जरापण. पण तिचा आवाज मला जणू घट्ट मिठी मारून बसला होता. ती तिच्या डोळ्यांनी बोलत होती अख्खं नाटक. बाकीची सगळी मुलं मान खाली घालून अभ्यास करत होती. मी निरखून पाहिलं तर सगळे बाकडय़ाला डोकं लावून डोळे बंद करून काहीतरी लिहीत होते. ताई शाळेबाहेरच्या टाकीशी उभी राहून तिच्या वॉटरबॉटलमध्ये पाणी भरत होती. तिने माझ्याकडे हसून पाहिले आणि मला तिकडे बोलावलं. मलापण तहान लागली होती. मी उठलो तर आजूबाजूच्या सगळ्या मुलांनी एकत्र माना वर केल्या आणि सगळे माझ्याकडे पाहू लागले. त्यांचे डोळे काळे होते. पूर्णपणे काळ्या शाईसारखे. मी धावत सुटलो. माझ्या शाळेचा लांबलचक न संपणारा कॉरिडॉर पार करून ग्राऊंडवर धावत सुटलो. आईच्या स्टेजजवळ जाऊन बसलो एकटाच. आजूबाजूला कुणीही नव्हतं. मी एकटाच. गुडघे छातीशी धरून मी बसून राहिलो तिचे नाटक बघत. मी तिच्याकडे पाहिले तर तिचे ओठ हालत होते, पण तिचा आवाज येत नव्हता. मला अचानक बहिरं झाल्यासारखं वाटलं. काम करता करता तिचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि ती तशीच थांबली. स्टेज उतरून खाली आली माझ्याजवळ. मी तिच्याकडे खिळल्यासारखा पाहत होतो. ती कुठल्यातरी राणीसारखी दिसत होती. तिचा चेहरा जणू चांदण्यांसारखा चमकत होता. ग्राऊंडवरचं स्टेज नाहीसं झालं. शाळापण. सगळीकडे अंधार पसरलेला आणि गार वारा सुटलेला. आई हळूहळू माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या हातात एक काचेची बाटली ठेवली. तिच्यातून एक प्रकारचा घाण वास येत होता.

‘हे काय आहे आई? हे तू मला का दिलंयस? मला नाही आवडत हे. आपण घरी जाऊ या?’ नजर माझ्यावर ठेवून ती हळूहळू मागे सरकत होती. तिच्या अंगावरचा एक-एक दागिना गाळून खाली पडत होता. तिच्या डोळ्यातली चमक कमी होताना जाणवत होती. ती मागे सरकत गेली आणि अंधारात गायब झाली. पूर्ण अंधार.

संध्याकाळी झोपेतून उठल्यावर आपण खूप वर्षांनी जागे झालो आहोत असं वाटत होतं. डोकं हलकं जड झालं होतं. तहान लागली होती. बाहेर अंधार पडला होता. कुठूनतरी लांबून सनई ऐकू येत होती.. आणि दिवाळीतला माझा सगळ्यात आवडता गंध येऊ लागला होता. प्रत्येक सणाचा एक वास असतो. जो आपल्या नकळत आपल्याला वेगळ्या जगात नेतो. आपल्याला थांबवतो. आपल्यासमोर आठवणींनी भरलेली एक पेटी आणून ठेवतो आणि आपण त्याच तंद्रीत, त्या पेटीमध्ये आपल्याला आवडणारी आठवण शोधत राहतो. दिवाळीतला गंध काही वेगळाच असतो. उदबत्त्या, झेंडूची फुलं, फटाके, फराळ, अत्तर या सगळ्यांनी भरलेला. तो गंध जागेपणीही येतो. स्वप्नातही येतो. मी माझ्या गुबगुबीत आणि उबदार रजईला मिठी मारून आणि उशीवरच्या फुलांच्या चित्रांवरून बोट फिरवत पडून राहिलो होतो. बाहेर लावलेल्या आकाश कंदिलाचा प्रकाश खाली फरशीवर पडला होता. वाऱ्यासोबत जसं आकाशकंदील हालत होता तसा तो प्रकाशही इकडे-तिकडे नाचत होता. थोडय़ावेळाने माझ्या लक्षात आलं की घरात मी एकटाच. मी उठून स्वयंपाकघरात पाहिलं. गच्चीत पाहिलं. कुणीच नव्हतं. शेगडीवरच्या चहाच्या भांडय़ात चहा तसाच होता, नुकताच केलेला. फोन रिसिव्हरवरून खाली पडून लोंबकळत होता. टीव्ही चालू होता, पण त्यातून आवाज येत नव्हता. अचानक सगळे गेले कुठे? तेवढय़ात ताईची हाक आली खालून.

‘आवर पटकन. आणि खाली ये.’

‘कुठे जायचंय? आई कुठाय?’

‘तू ये खाली.’

ती मला तिच्या गाडीवरून प्रभात रोडवरच्या इन्कम टॅक्स लेनमध्ये घेऊन आली. आमची आवडती लेन. तिथे खूप मस्त घरं असतात. काही मस्त बंगलेसुद्धा असतात. आमचा नेहमीच टाइमपास असतो तो. कंटाळा आला की ताईच्या मागे बसून प्रभात रोडवर जाऊन लोकांची घरं बघत िहडायचं. तिथे एक वेगळ्याच प्रकारचा गारवा असतो. तिथल्या सोसायटी कमालीच्या सुंदर असतात. शांत असतात. खिडक्यांमधून कुणी तरी स्वयंपाक करताना दिसतं, कुणी टीव्ही बघत पडून असतात, कुणी घर आवरत असतात, कुणी चहा पीत असतात. मला कायम प्रश्न पडतो की यांचं आयुष्य कसं असेल या मस्त मस्त घरांमध्ये? काय करीत असतील हे आता? काय बोलत असतील? किती छान राहत असतील ना? मग आम्ही दोघं कॅनॉल रोडवरची पाणीपुरी खायचो आणि फ्री मिळालेल्या मसाला पुऱ्यांना फुंकर मारत हळूहळू खात त्या शांत रस्त्याकडे पाहत बसायचो. आज तर तो रस्ता फार सुंदर दिसत होता. एरवी तिथल्या दाट झाडींमुळे तो रस्ता अंधारा दिसायचा, पण आज लोकांच्या खिडकीतल्या कंदिलांमुळे अख्खा रास्ता उजळून गेला होता. मी अशाच कुठल्या तरी कंदिलाकडे पाहत बसलो होतो.

‘आणखी एक-एक खाऊ या का?’, ताईने विचारलं.

तेवढय़ात मला लक्षात आलं की, इतका वेळ मी आणि ताई बोललोच नव्हतो एकमेकांशी. ती पण वेगळ्याच तंद्रीत होती.

‘मला नको. तुला हवी तर घे. तू कुठे होतीस दिवसभर?’

तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं.. मग थोडय़ा वेळाने..

‘बरं ऐक. आईला फार प्रश्न विचारू नकोस. त्यांचं भांडण होणारे आज. खूप जास्त. तू झोपलेला असताना आईला कुणाचा तरी फोन आला आणि ती तशीच बाहेर गेली. खूप रागावली होती.’

‘ओके. पण तू कुठे होतीस?’

‘मत्रिणीकडे होते. नव्हतं थांबावंसं वाटत. आम्ही मत्रिणी महाबळेश्वरला जाणारोत काही दिवस. कंटाळा आलाय मला सगळ्याचा. चल तू पण. आईला पण घेऊन जाऊ. माझा जॉब सुरू होऊ दे रे.’

मी तिला काही तरी विचारणार तेवढय़ात तीच, ‘बाबा कुठे गेलेत म्हणून नको विचारूस. मला माहीत नाही. कळेलच आता. यांना पण दिवाळीतच सुचलं असं वागायला.’

मला ती काय बोलतीये हे काहीच कळत नव्हतं.

‘आणखी एक-एक खाऊ या?’, मी विचारलं..

ती हसली. ‘चल. खाऊ या.’

वाडय़ाखाली आल्यानंतर मित्रांसोबत भरपूर फटाके फोडले माझ्याकडचे भुईनळे आणि चक्रसुद्धा आणले मी. चतन्यच्या आईने आम्हाला पेप्सीकोला दिले. मी तीन संपवले. फटाके फोडून झाल्यावर आम्ही शिरा-पुरी खेळायला लागलो. ते खेळताना आमचा आरडाओरडा अगदी बाजीराव रोडपर्यंत ऐकू जायचा. खेळता खेळता केतनचा झब्बा फाटला. खूप रडायला लागला.. ‘आई खूप मारणार आता!’, असं म्हणत म्हणत घरी पळून गेला. तेवढय़ात फाटककाका एक मोठी पिशवी घेऊन त्यांच्या गाडीतून उतरले. तीन-चार लांबुडके बॉक्सेस होते त्यात. मला चटकन कळलं ते काय आहे ते. माझी सगळ्यात आवडती गोष्ट. सगळ्यात जास्त.

‘काय रे. येतोयस का गच्चीवर?’ त्यांनी विचारलं.

‘नको काका.. मी पत्र्यावरून पाहतो.’

मी शेजारी पडलेली माझी फटाक्यांची पिशवी उचलली आणि जरा जास्त घाईघाईत घराचे जिने चढत वर आलो. अंगावरचा झब्बा काढला. टी-शर्ट चढवला. एका बाऊलमध्ये थोडा चिवडा आणि तीन चकल्या घेतल्या. कॉटवर चढलो. वर एक सतरंजी टाकली. चिवडय़ाची वाटीही हात वर करून सरकवली. कठडय़ाशेजारच्या जाळीवर पाय ठेवला आणि त्याचा आधार घेऊन पत्र्यावर हात टाकला. हाताला काचेचं काहीतरी लागलं. काचेची बाटली होती एक. त्यावर  ओल्ड माँक असं लिहिलं होतं. पत्र्यावर चढल्यावर दिसलं की अजून १५-१६ बाटल्या पडल्या आहेत. प्रत्येक बाटलीवर वेगळं चित्र होतं. या वेळेस खूप होत्या. एरवी तीन-चार असायच्या. खूप घाण वास येत  होता. म्हणून मी त्या एकेक करून कोपऱ्यात नेऊन ठेवल्या. समोरच्या गच्चीवर फाटककाका आले त्यांच्या मुलांसोबत. त्यांनी पिशवीतून ते बॉक्सेस काढले. मी पटकन सतरंजीवर जाऊन आडवा पडलो. आकाशाकडे तोंड करून.

‘लागला.. लागला..’ असा ओरडण्याचा आवाज आला आणि  थोडय़ा वेळाने त्या काळ्या आकाशावर केशरी रंगाची रेघ ओढल्यासारखा एक बाण वर आला. हळूहळू वर गेला. जरा थांबल्यासारखा झाला आणि तेवढय़ात.. धडाम.. संपूर्ण आकाशावर वेगवेगळ्या रंगांच्या चांदण्या चमकल्यासारखं झालं. आता सगळ्या बाजूंनी एकेक करून बाण येऊ  लागले आणि मागचं काळं आकाश दिसेनासं होईपर्यंत फुटू लागलं. सगळे वेगवेगळ्या रंगांचे. वेगवेगळ्या प्रकारचे. वेगवेगळ्या चांदण्यांचे. मी एका सेकंदापुरतेसुद्धा डोळे मिचकावले नाहीत. पाहत बसलो त्यांच्याकडे वेडय़ासारखा. आपण स्वत: आकाशात असल्यासारखं वाटलं. तरंगत असल्यासारखं. मला त्या बाणांची एक गोष्ट फार आवडायची. आधी तो बाण फुटतो आणि थोडय़ा वेळाने आपल्याला त्याचा आवाज ऐकू येतो. मी मधेमधे सेकंद मोजायचो. कधी दोन, कधी तीन; पण तो आवाज यायचा  नक्की. मला खूप जादूई वाटत होतं ते सगळं. आपल्यासाठी केलेली जादू. कधी कधी वाटायचं आपण रात्रभर पडून राहावं इथेच आणि आपल्या डोळ्यांसमोर बाण फुटत राहू देत, रात्रभर.

फटाक्यांचे आवाज थांबले आणि मला त्याच्या मागे लपलेल्या आरडाओरडीचे आवाज येऊ  लागले. मी इकडेतिकडे वळून पहिलं. खाली रस्त्यावर पाहिलं. कुणीच नव्हतं. आता तो आवाज वाढत चालला होता. जवळ येऊ  लागला होता. असं वाटलं की, आपल्यापैकी कोणावर तरी कुणी तरी ओरडतंय. नंतर मी त्या  आवाजांना ओळखलं. आई-बाबा. ताई म्हणाली ते खरं  होतं. मी पत्र्यावरून वाकून पाहिलं. आज मी बाबांना पहिल्यांदा तसं पाहिलं. एक वेगळाच माणूस होता तो. वेगळाच चेहरा. वेगळे डोळे. वेगळं बोलणं. झब्बा फक्त तोच होता. सकाळी पाहिलेला. बाबांचा हा चेहरा कधीकधीच दिसायचा. पाहुणे घरी आल्यावर ते सगळे स्टीलच्या ग्लासातनं काही तरी पीत बसायचे तेव्हा. आज तो चेहरा ठळक  दिसत होता. हॉरर फिल्म्समध्ये दाखवतात ना तसं; की एका चांगल्या माणसाच्या शरीरात भूत शिरतं आणि त्याचा चेहरा बदलतो, वागणं-बोलणं बदलतं. तो माणूस मग विचित्र आणि घाणेरडा दिसायला लागतो. नकोसा  वाटतो. बाबांच्या अंगात काय शिरलं असेल? दोघंही जिवाच्या आकांतानं  एकमेकांवर ओरडत होते. आई रडत होती. बाबांना नीट उभंही राहता येत नव्हतं. आईने त्यांच्या तोंडासमोर  फोनचं बिल धरलं होतं आणि ती काय काय विचारत होती. बाबा खूप बोलायचे फोनवर आई झोपली की. म्हणून चिडली असेल का आई? बाबांनी तिला काही तरी सांगून थांबवलं. ती शांत झाली काही क्षण आणि मग चेहरा हाताच्या तळव्यांनी झाकून ओरडायला लागली. ती आता  रडत नव्हती, चिडली नव्हती, फक्त ओरडत होती, जोरात चटका बसल्यासारखा. ती इतक्या जोरात ओरडली की माझे कानच बंद झाले. मला काहीच ऐकू येत नव्हतं. मी आईच्या ओरडण्याकडे बघत राहिलो नुसता. मला वाटलं की कदाचित तिचाही आवाज थोडय़ा वेळाने येईल. मी सेकंद मोजत राहिलो; पण  आलाच नाही. बिलकूल नाही. आईने थोडय़ा वेळाने बाबांना घराच्या  दरवाजाकडे बोट करून दाखवलं आणि ते निघून गेले. परत जिन्याच्या अंधारात गायब झाले. मी वर सरकलो आणि मांडी घालून आकाशाकडे पाहत बसून राहिलो. मी डावा हात छातीशी लावला तर खूप धडधड जाणवत होती. आता काय  झालं नक्की? कुणाची चूक होती? बाबा कुठे गेले? आणि आता मी हे कुणाला विचारू? फक्त प्रश्न. आता आजूबाजूंच्या फटाक्यांचाही आवाज येत नव्हता. अवतीभोवतीचं सगळं जग चमकत होतं नुसतं. मला हळूहळू त्या फुटणाऱ्या बाणांची भीती वाटू लागली. प्रत्येक बाण फुटायचा तेव्हा त्याचा एक भयाण चेहरा तयार व्हायचा आणि जवळ जवळ येऊ  लागायचा. मी डोळे गच्च मिटून घेतले. आता फक्त छातीतील धडधड ऐकू येत होती. धाम! धाम! धाम!

थोडय़ा वेळाने पत्र्यावर हालचाल जाणवली. मी चपापून पाहिलं. पत्र्यावर एक हात आला आणि एक-एक बाटली घेऊ  लागला. मी वाकून पाहिलं तर आई प्रत्येक बाटली एका पोत्यात भरत होती. ती शून्यात बघून ते करत होती. सगळ्या बाटल्या संपल्यानंतर ती परत चाचपडून बघत होती. हात लांब करून बघत होती. ती ते करत असताना मी तिच्या हातावर हात ठेवला. तिने चटकन माझ्याकडे  पाहिलं. आम्ही दोघंही शून्यात बघितल्यासारखे एकमेकांकडे बघत राहिलो. खूप वेळ. कुणी काहीच बोलत नव्हतं. निर्विकार चेहरा आरशात बघावा असे पाहत राहिलो. नंतर अचानक तिच्या डोळ्यांमध्ये जीव आल्यासारखं झालं. ती हसली  आणि जीभ बाहेर काढून चिडवलं मला.

‘‘ये लवकर खाली. गंमत देते तुला,’’ असं म्हणून आत गेली.

मी थोडय़ा वेळाने खाली उतरून स्वयंपाकघरात गेलो. आई ओटय़ाशी काही तरी करत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिला घट्ट मिठी मारली. खूप वर्षांनी तिला मिठी मारतोय असं वाटलं. खूप शांत वाटलं. धडधड गायब झाली. मी तिला काही तरी विचारायला जाणार तेवढय़ात तिने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि माझ्यासमोर एक ताट ठेवलं. आईने चकोल्या केल्या होत्या. माझ्यासाठी. माझे डोळे मोठे झाले. त्या ताटात चकोल्या पसरल्या होत्या  सगळीकडे आणि वर टाकलेला तुपाचा गोळा हळूहळू विरघळून ताटाच्या कडाशी जाऊन थांबत होता आणि एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध त्यातून येत होता. मी अर्थातच हरवून  गेलो.
सौजन्य – लोकप्रभा