‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या प्रसिद्ध शोमधून बाहेर पडल्यानंतर ‘गुथ्थी’ म्हणजेच सुनील ग्रोव्हर एक नवीन मोठा शो घेऊन येतो आहे, अशी चर्चा होती. गुथ्थीचा हा नवा शो ‘मॅड इन इंडिया’ नवीन कलाकारांसह ‘स्टार प्लस’वर दाखल होतो आहे. कपिलच्या शोमध्ये ‘सिद्धू’पाजी आहेत तर गुथ्थीच्या नव्या शोमध्ये आमचा सिद्धू आहे. सोनी टीव्हीवर ‘कॉमेडी सर्कस’च्या तिन्ही पर्वात काम केल्यानंतर सिद्धार्थ आता ‘मॅड इन इंडिया’ या नव्या शोमध्ये, नव्या कलाकारांसह नव्या विनोदी भूमिकेत दिसणार आहे.
‘मॅड इन इंडिया’ विषयी बोलायच्या आधीच २०१४ हे वर्ष माझ्यादृष्टीने फार खास ठरले आहे, असे सिद्धार्थने ‘वृत्तान्त’ला सांगितले. या नव्या वर्षांत एकीकडे ‘मॅड इन इंडिया’सारखा विनोदाची नवी धाटणी असलेला शो करायला मिळतो आहे. दुसरीकडे बऱ्याच वर्षांनी १४ फेब्रुवारीला माझा रोमँटिक चित्रपट ‘प्रियतमा’ प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे या वर्षांची सुरुवातच खास असल्याची भावना सिद्धार्थने व्यक्त केली.
खरेतर, ‘कॉमेडी सर्कस’ची तीन पर्व केल्यानंतर आता राष्ट्रीय मनोरंजन वाहिन्यांवर पुन्हा त्याच त्याच विनोदी प्रकारच्या शोमध्ये काम करायचे नाही, असे मी ठरवले होते. त्याच दरम्यान ईटीव्ही मराठीच्या ‘मॅड’ या नृत्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालनही सुरू होते. पण, ‘मॅड इन इंडिया’साठी जेव्हा स्टार प्लसकडून विचारणा झाली तेव्हा त्याला नाही म्हणणे शक्य नव्हते. कारण या शोचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. त्याची विनोदाची धाटणीही वेगळी आहे, असे सिद्धार्थने सांगितले.
या शोमध्ये काल्पनिक भारतनगर उभारण्यात आले आहे. मोहल्ला, तिथे राहणाऱ्या वेगवेगळ्या भाषेच्या, धर्माच्या व्यक्ती आहेत. यामध्ये सिद्धूूचा मराठमोळा तडकाही असणार आहे. हो म्हणजे मी सेटवरही ‘होऊ दे खर्च. झाला उशीर तर.’ असे काहीतरी यमक जुळवून जुळवून संवाद ऐकवत असतो. या भारतनगरमध्ये डॉली अहलूवालियाची मँगो डॉली आहे. तिचा एक पंजाबी हेल आहे. श्वेता तिवारीची कतरिना मिश्रा आहे. तसेच माझाही मराठी मॅडनेस पहायला मिळेल. पण, मी या शोमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येणार आहे, अशी माहिती सिद्धार्थने दिली. मनिष पॉल हा या शोचा सूत्रसंचालक आहे. या सगळ्या शोमधले विविध भाग एकत्र गुंफण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. तर सुनील ग्रोव्हर या शोमध्ये चुटकीची भूमिका करतो आहे. तो आमच्यासाठी खरा आधारस्तंभ आहे. इतके  चांगले कलाकार, मोठे प्रॉडक्शन हाऊस आणि स्टार प्लससारखी वाहिनी त्यामु़ळे ‘मॅड इन इंडिया’चा भाग व्हायला मिळाल्याबद्दल सिद्धार्थने आनंद व्यक्त केला.