News Flash

रक्षाबंधन विशेषः पंकजाक्षीने स्वकर्तृत्वाने ओळख निर्माण केली- सिद्धार्थ जाधव

चौथीनंतर माझी शाळा बदलली. केवळ तिच्यामुळेच मला खासगी शाळेत टाकण्यात आले

आम्ही तीन भावंडं आहोत. सर्वात मोठा भाऊ लवेश त्यानंतर आमची बहिण पंकजाक्षी आणि सर्वात लहान मी. तिघांमध्ये मी सर्वात लहान असलो तरी तिच्यासाठी मी तिच्यापेक्षा नेहमीच मोठा आहे.

मला अजूनही आठवतं लहानपणी ओवाळणी म्हणून ताटात एक रुपया टाकायचो. बाबांकडून पैसे घ्यायचे आणि पंकजाक्षीला ओवाळणीत टाकायचे, असेच आम्ही दोघेही भाऊ कित्येक वर्ष करत आलो. ओवाळणीत आधी एक रुपया मग शंभर रुपये नंतर त्याचे हजार रुपये कधी झाले कळलचं नाही. आता सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात. शूटींगमुळे मी शहरात असेनच असे नाही. ऐन रक्षाबंधनाच्या वेळेला मी दौ-यावर असलो तर मला नंतर राखी बांधून घ्यावी लागते. दरम्यान, कित्येक वर्ष तर आम्ही रक्षाबंधन करूच शकलो नाही. मग दुस-या दिवशी राखी बांधायची. पण आता गेले काही वर्ष आम्ही न चुकता भेटतो. मी दादरला राहतो तर ताई गोरेगावला राहते. त्यामुळे एकतर ती घरी येते किंवा मी तिच्या घरी जातो. माझ्या बहिणीने एम.ए नंतर लॉ पूर्ण केलं. ती आता काउन्सिलिंग करते. त्यामुळे तिने सिद्धार्थ जाधवची बहिण म्हणून नाही तर स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण केलीए. मला तिचा खूप अभिमान वाटतो. मी तर म्हणतो माझ्या यशामागेसुद्धा तिचाच हात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे त्याचे आई-वडिल असतात. पण माझ्या यशात पंकजाक्षीचाही मोठा वाटा आहे. माझे शालेय शिक्षण सुरुवातीला महापालिकेच्या शाळेत झाले. चौथीनंतर माझी शाळा बदलली. केवळ तिच्यामुळेच मला खासगी शाळेत टाकण्यात आले. आज आम्ही तिघही भावंडं आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहोत.

शब्दांकन- चैताली गुरव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 9:15 am

Web Title: siddharth jadhav talking about his sister pankjakshi 2
Next Stories
1 धोनीच्या चित्रपटाचा ट्रेलर मराठीत
2 टीव्हीवरची प्रादेशिक विविधता
3 ‘बार बार देखो’साठी कतरिनाने घटवले सात किलो वजन
Just Now!
X