‘अंबरसरिया’ फेम गायिका सोना मोहापात्रा हिने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मदारिया सुफी फाऊंडेशनकडून धमक्या येत असल्याचं मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं. ‘तोरी सूरत’ गाण्यासाठी तिला या धमक्या देण्यात येत असल्याचं ट्विट करत तिने स्पष्ट केलं. ‘लाल परी मस्तानी’ या सोनाच्या नव्या म्युझिक प्रोजेक्टचा भाग असणारं हे गाणं अमीर खुसरो यांनी निजामुद्दीन अवलिया यांच्यावरील प्रेमापोटी लिहिलं होतं. पण, त्यावरुनच आता धर्माचं राजकारण रंगलं जात असून सोनावर काही सुफी संस्थांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

आपल्याला येणाऱ्या धमक्या पाहता सोनाने काही अनुचित प्रकार होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांचा उल्लेख करत ट्विट केलं. ‘मला मदारिया सुफी फाऊंडेशनकडून सर्व समाजमाध्यमांवरुन माझ्या गाण्याचा व्हिडिओ काढून टाकण्याविषयीच्या धमक्या येत आहेत. या व्हिडिओमध्ये काही अश्लील गोष्टी असून, त्यातून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळेच त्यांनी ही मागणी केली आहे. अशा वेळी काय करावं हेच मला कळत नाहीये’, असं ट्विट सोनाने केलं. त्याशिवाय त्या सूफी संस्थेने आपल्यावर यापूर्वी गायलेल्या काही गाण्यांवरुनही आरोप केल्याचं तिने ट्विट करत म्हटलं. तोकडे कपडे घालून या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनबुजून तरुणाईची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोपही सोनावर करण्याच आला आहे. आपल्याला वारंवार ई- मेलच्या माध्यमातून व्हिडिओ हटवण्यासंबंधीच्या धमक्या येत असल्यामुळे अखेर हा सर्व प्रकार कुठेतरी थांबवावा यासाठी सोनाने हे पाऊल उचललं.

दरम्यान ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विट करत या प्रकरणात आपलं मत मांडलं आहे. ट्विट करत त्यांनी अमीर खुसरोंच्या साहित्यावर कोणाची मालकी नसून सर्व भारतीयासाठीचा तो एक ठेवा आहे. त्यामुळे ही तुमची खासगी मालमत्ता नाही, असं त्यांनी सुफी संगीत कोणाची खासगी मालमत्ता नाही. असं म्हणत त्यांनी सोनावर आरोप करणाऱ्यांची कानउघडणी केली आहे. दरम्यान, जावेद अख्तर यांच्या ट्विटविषयी सोनाने त्यांचे आभार मानले. याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण कलाविश्व माझी साथ देतंय हा महत्त्वाचा मुद्दाही तिने वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मांडला.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये